औरंगाबाद : लासुर स्टेशन परिसरात महिलांचा विनयभंग करुन दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडाची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली. एमपीडीए कायद्यातंर्गत वर्षभरासाठी या गुंडास स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी पदभार स्विकारल्यापासून अशी कारवाई केलेला हा चौथा गुंड ठरला आहे.
सर्फराज सलीम शहा (२७, रा. सावंगी, लासुर स्टेशन, ता. गंगापुर) असे गुंडाचे नाव आहे. त्याच्या विरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात घरफोडी, जबरी चोरी, विनयभंग, दुखापत करणे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे गुन्हे दाखल आहेत. नागरिकांनी दारुसाठी पैसे न दिल्यास मारहाण करुन खंडणी गोळा करण्यात हा पटाईट होता. त्याच्यावर हद्दीपारीसारख्या प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केल्या, मात्र त्याचे गुन्हे वाढतच गेले. त्यामुळे अधीक्षक कलवानिया यांनी सर्फराजवर एमपीडीएची कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सिल्लेगाव ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. हा प्रस्ताव अधीक्षक कलवानिया यांनी मंजूरीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे पाठवला. त्यांनी १९ सप्टेंबर रोजी मंजुरी दिल्यानंतर निरीक्षक सुरवसे, अंमलदार विठ्ठल राख, शगुन थोरे, तात्यासाहेब बेंद्रे, सातपुते, गुडे, भिसेे यांच्या पथकाने सर्फराजला पकडून हर्सूल कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले.
रस्त्यात महिलांचा विनयभंगगुंड सर्फराजला दारुचे प्रचंड व्यसन आहे. तो दारु पिल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या महिलांचा विनयभंग करीत होता. तसेच घरफोडीसाठी गेलेल्या ठिकाणीही तो महिलांची छेड काढी. त्याच्या दहशतीमुळे महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या.
चार जणांना स्थानबद्धअधीक्षक कलवानिया यांनी पदभार स्विकारल्यापासून आतापर्यंत अमोल चिडे (रा. मुरमा ता. पैठण), वाळु माफिया मुजीब शेख (रा. सनव, ता. गंगापुर), रामदास वाघ (रा. केळगाव, ता. सिल्लोड) आणि सर्फराज सलीम शहा या चार जणांची रवानगी हर्सुलमध्ये केली आहे.