शांतीलाल गायकवाड , औरंगाबादमध्यप्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा हा आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. तो घोटाळा सत्यावर आधारितही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी (आरएसएस) कायम शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यातलाच हा प्रकार असल्याचे मत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ग्रंथ प्रकाशन समारंभानिमित्त भय्याजी जोशी शनिवारी शहरात आले असता, लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. मध्यप्रदेशातील राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यावर बोलताना जोशी म्हणाले की, संघ आदर्शाची निर्मिती करतो, अशा कामात संघ नसतो; परंतु संघाविषयी शंका निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न सातत्याने केले जातात. सीबीआय कुणाचीही चौकशी स्वत:हून करीत नसते. तशी मागणी झाली तर चौकशी होते. मध्यप्रदेशातही मागणी झाल्याने ही चौकशी सुरू झाली आहे; परंतु या चौकशीला सत्याच्या आधार नाही. यामागेही राजकारण आहे. मध्यप्रदेश व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना सीबीआय कुणाच्या दडपणाखाली काम करते, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देणे त्यांनी टाळले. केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या एक महिन्याच्या कामगिरीकडे संघ कसा पाहतो, असे विचारता ते म्हणाले की, एक महिन्यात सरकारच्या कामगिरीचे आकलन होणे व करणेही न्यायपूर्ण होणार नाही. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. त्यानंतरच काही ठरविता येईल; परंतु सरकारची काम करण्याची गती पाहता, ते काहीतरी विधायक करील, असे वाटते. रेल्वे प्रवासी भाडेवाढीमुळे जनतेतून संताप व्यक्त होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता जोशी म्हणाले की, भाववाढ झाली तर नागरिकांना राग येणे स्वाभाविकच आहे; परंतु रेल्वे तोट्यात होती. गेल्या ५ वर्षांपासून भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे तोटा वाढतो आहे.विद्यमान सरकारला रेल्वेला तोट्यातून बाहेर काढायचे आहे. त्याला त्याचे स्वत:चे अर्थतंत्र उभे करायचे असावे, काही सुधारणा हाती घेतल्या असाव्यात, त्यासाठी सरकारने कदाचित नाइलाजानेच दरवाढ केली असावी, असे सांगितले खरे; परंतु रेल्वे भाववाढीचे कोणतेही समर्थन संघ करीत नाही, असेही स्पष्ट करण्यास ते विसरले नाहीत.
म.प्र. तील घोटाळा चिंतेचा विषय नाही
By admin | Published: June 29, 2014 12:41 AM