लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गणेश विजर्सन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन शिवसेनेचे खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली़ त्यामुळे शिवसेनेतील वाद पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी चव्हाट्यावर आला असून, निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़परभणी जिल्हा हा शिवसेनेचा गड असला तरी गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेतील अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत़ विधानसभा निवडणुकीनंतर खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले़ त्यानंतर या मतभेदाचे रुपांतर वादामध्ये झाले; परंतु, हे वाद सार्वजनिक ठिकाणी कधी पहावयास मिळाले नाहीत़ परंतु, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास शहरातील शिवाजी चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पहावयास मिळाले़ प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गणेश मंडळांचे देखावे आणि श्रींच्या मूर्ती विसर्जन मार्गावरून पुढे जात होत्या़ यावेळी शिवाजी चौक येथे गणेश मंडळ पदाधिकºयांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मंच उभारण्यात आला होता़ मंचावर आ़ डॉ़ राहुल पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सह संपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर आदींची उपस्थिती होती़ यावेळी राजे संभाजी गणेश मंडळाची मिरवणूक या ठिकाणी दाखल झाली़ मिरवणुकीत खा़ बंडू जाधव होते़ शिवसेनेच्या व्यासपीठावरील सूत्रसंचालकाने खा़ जाधव यांना व्यासपीठावर येण्याची विनंती केली़ त्यानंतर खा़ जाधव हे व्यासपीठावर जाऊन बसले़ काही वेळानंतर मिरवणुकीतील उपस्थितांपैकी काही कार्यकर्त्यांनी खा़ जाधव यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या़ यावेळी या कार्यकर्त्यांना आ़ राहुल पाटील यांनी समजविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, कार्यकर्ते थांबत नसल्याने बाचाबाची वाढली़ यावेळी खा़ जाधव व आ़ पाटील यांच्यातच शाब्दिक खडाजंगी सुरू झाली़ त्यामुळे एकच गोंधळ उडाला़ तणाव निर्माण झाल्याने तातडीने शहर पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी शिवसेनेच्या व्यासपीठावर दाखल झाले़ त्यांनी व्यासपीठावरील माईक ताब्यात घेऊन सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले़ परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी सुमारे २०० ते २५० कर्मचाºयांचा आगाऊ बंदोबस्त मागवून घेतला़ काही वेळानंतर खा़जाधव हे राजे संभाजी गणेश मंडळाच्या मिरवणुकीसोबत निघून गेले़ त्यानंतर रात्री १२़२० च्या सुमारास सर्वात शेवटी असलेल्या नागराज गणेश मंडळाच्या मिरवणुकीनंतर आ़ डॉ़ राहुल पाटील हेही कार्यकर्त्यांसह निघून गेले़
खासदार-आमदारांमध्ये शाब्दिक खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:35 AM