औरंगाबाद : सर्व निकषांची पूर्तता करूनही ॲपमधील तांत्रिक त्रुटीमुळे ‘एमपीएससी’तर्फे घेण्यात येणाऱ्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेसाठीच्या यादीत नाव न आलेल्या प्रिया राजीव आव्हाड हिच्या अडचणी संपल्या नाहीत. उच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर रोजी आदेश देऊनही पुन्हा पूर्वीसारख्याच तांत्रिक अडचणींना तोंड देत अखेर २५ सप्टेंबर रोजी तिचा अर्ज दाखल झाला. मॅटपुढील प्रलंबित अर्जाच्या निकालाशिवाय तिला ३० ऑक्टोबर रोजीची मुख्य परीक्षा देता येणार नाही. त्यासाठी मॅटने प्रियाचा मूळ अर्ज ३० ऑक्टोबरपूर्वी निकाली काढावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी दिला आहे.
अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केलेल्या प्रिया आव्हाड हिने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेसाठी आयोगाच्या जुन्या वेबसाईटवरून ‘ऑनलाईन’ अर्ज भरला होता. त्या वेळी ॲपमधील तांत्रिक अडचणीमुळे तिचे नाव मुख्य परीक्षेच्या यादीत आले नाही. पूर्वपरीक्षेत इतर मागासवर्ग महिला आणि खुल्या महिला पदासाठी अंतिम गुणांकन २३.७५ निर्धारित करण्यात आले होते. प्रियाला ३२.५० गुण मिळाले होते. तिच्याकडे ‘नॉन क्रिमीलेअर’ व ‘जात वैधता’ प्रमाणपत्र आहेत. तिने ३० ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरला तेव्हा एमपीएससीच्या वेबसाईटमधील ‘तांत्रिक त्रुटी’ निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र, आयोगाने त्याची दखल घेतली नाही. म्हणून तिने ‘मॅट’मध्ये मूळ अर्ज दाखल करून तिला पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे घोषित करावे. तसेच ३० ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती.
‘मॅट’ने २० सप्टेंबरपूर्वी एमपीएससीने प्रियाच्या अर्जावर निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. अंतरिम आदेश देण्यास नकार देत ८ ऑक्टोबरला सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, प्रियाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाच्या आदेशामुळे तूर्तास तिचा अर्ज दाखल झाला आहे.