औरंगाबाद : राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार लोकसेवा आयोगाने १४ मार्चरोजी होऊ घातलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा- २०२० ही पुढे ढकलण्याचा निर्यण घेतला आहे. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून सलग तीनवेळा ही परीक्षा पुढे ढकल्यात आल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शहरातील औरंगपुरा येथे महात्मा फुले चौकात हजारो विद्यार्थ्यांनी जमून शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला.
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी ‘एमपीएससींची राज्यसेवा पूर्वपरीक्षा ऐनवेळी रद्द करुन ती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केल्याचे समजताच विद्यार्थ्यांनी तीव्र नापसंती दर्शवली. हजारो विद्यार्थी महात्मा फुले चौकात जमा झाले. आक्रमक विद्यार्थ्यांनी शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परीक्षा घेण्याची मागणी केली. वर्षभरात सलग तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. भविष्य अंधकारमय झाले आहे, उमेदीची वर्ष वाया जात असून परीक्षा होत नसल्याने हाती काहीच लागत नसल्याचा संताप आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद शहरातील ५९ केंद्रावर १९ हजार ६५६ विद्यार्थी परीक्षा देणार होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची पूर्वतयारी करण्यात आली होती. या परीक्षेच्या कामासाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, शिपाई अशा जवळपास ६०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या कर्मचाऱ्यांचे उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रशिक्षण देखिल घेण्यात येणार होते; परंतु, राज्यात वाढत चालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही परीक्षा घेण्यास हरकत घेतली. त्यानुसार राज्य लोकसेवा आयोगाने तातडिने ही नियोजित परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे एका अध्यादेशाद्वारे गुरुवारी जाहीर केले.