विजय सरवदे
औरंगाबाद : राज्य आयोगाने २०२० मध्ये जाहीर केलेली राज्य सेवा पूर्वपरीक्षा सातत्याने पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थी यंदाच्या मार्च महिन्यात रस्त्यावर उतरले. राज्यभरात आक्रमक आंदोलन झाल्यानंतर अखेर २१ मार्च रोजी ती परीक्षा घेतली. मात्र, त्या परीक्षेचा निकाल अजूनही जाहीर केलेला नाही. कधी कोविडचे, तर कधी मराठा आरक्षणाचे कारण सांगत सतत परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. नवीन जाहिरात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून ते नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. दोन वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा परीक्षा पास झाली. मात्र, एमपीएससीकडून अजूनही शारीरिक चाचणी व मुलाखत घेतली जात नाही. सन २०१८ मध्ये झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जागांवर निवड झालेल्या उमेदवारांना अद्यापही नियुक्ती दिलेली नाही. एकंदरीतच राज्य लोकसेवा आयोगाच्या गोंधळाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. दोन वर्षांत नवीन एकही जाहिरात जाहीरात नाही. संयुक्त पूर्वपरीक्षा पाचवेळा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा, निकाल व निवडप्रक्रियेचे वेळापत्रक राबवावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे. एकंदरीत राज्य लोकसेवा आयोगाचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर कधी येणार, याकडे विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत.
चौकट.....
या वर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार
- यंदा परीक्षा होईल की नाही, ते निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही. मागील अडीच वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडे परीक्षा घेण्याचे नियोजन नाही.
- परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात पडले असून, अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत, तर दोन दिवसांपूर्वी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्यामुळे पालकांनाही चिंता सतावत आहे.
चौकट....
ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार
- कोरोनामुळे मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून ऑफलाइन क्लास घेण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे ऑनलाइन क्लास घेतले जातात. यापुढे आणखी किती दिवस हे असेच चालेले हे सांगता येत नाही.
- विद्यार्थी म्हणतात, ऑनलाइन क्लासमध्ये संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे या क्लासेसला फारसा प्रतिसाद भेटत नाही.
- प्रतिसाद मिळत नसला तरी क्लासेसचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ऑनलाइन क्लासेस चालवावे लागतात, असे क्लासेस चालकांचे म्हणणे आहे.
चौकट.............
क्लासचालकही अडचणीत
१८ महिन्यांपासून शासनाने क्लासेसला ऑफलाइन चालविण्यासाठी परवानगी दिलेली नाही. ऑनलाइनला प्रतिसाद मिळत नाही. औरंगाबादेत पाच हजार शिक्षक बेजरोगार झाले आहेत. आमच्यासमोर भाड्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रवेश नाहीत. त्यामुळे क्लासचालक कर्जबाजारी झाले आहेत. आमच्यावर बेंच विकण्याची वेळ आली आहे.
- धनंजय आकात, क्लास चालक
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सरकारने शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे ग्राह्य धरले व कोरोनाचे कारण देत क्लासेस बंद ठेवले आहेत. क्लास बंद असले, तरी आम्हाला दरमहा भाडे द्यावेच लागते. मागच्या १८ महिन्यांपासून आम्ही भाडे भरत आहोत. आता आमच्याकडेच पैसे नाहीत, तर शिक्षकांना आम्ही कुठपर्यंत आणि कोठून पैसे देणार.
- कृष्णा जाधव, क्लासचालक
चौकट..........
विद्यार्थ्यांचे वय निघून चालले
ऑनलाइन क्लासमध्ये फारसे समजत नाहीत. प्रश्न विचारता येत नाही. प्रश्न विचारले तर, त्याचे नीट निरसन होत नाही. दोन-अडीच वर्षांपासून आम्ही तयारी करती आहोत; पण परीक्षाच झाली नाही. आम्ही आणखी किती दिवस तयारी करायची. आमची निराशा झाली आहे. वय वाढत चालले आहे. काय करावे सूचत नाही.
- संतोष जाधव, विद्यार्थी
कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलाव्या लागत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मग, या काळात मोर्चे, आंदोलने, बैठका चालतात आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षाच चालत नाही, हा कुठला न्याय आहे. एमपीएससी परीक्षेची अनिश्चितता, वाढत चालले वय आणि दुसरीकडे नातेवाइकांकडून होणारी विचारपूस, यामुळे मनोबल खचत चालले आहे.
- रोहिणी जाधव, विद्यार्थिनी