गेवराई : तालुक्यात महावितरणचे हजारो ग्राहक असून त्यांच्याकडे महावितरणची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार नोटिसा देऊनही ग्राहक थकबाकी भरत नसल्याने महावितरणने तब्बल ९०० ग्राहकांच्या वीज जोडण्या बंद केल्या. महावितरणच्या या ‘शॉक’ने तब्बल ७० लाखांची वसुलीही झाली आहे.तालुक्यात जवळपास महावितरणचे १७ हजार थकबाकीदार ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची गेल्या अनेक वर्षापासूनची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने अशा थकबाकीदारांविरूद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे.या अगोदरही महावितरणने थकबाकीदारांना तीन- तीन वेळेस नोटिसा बजावलेल्या आहेत. यानंतरही ज्यांनी काहीच थकबाकी भरली नाही अशांवर महावितरणकडून आता थेट कारवाई करण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत गेवराई शहरातील १४० जणांचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. तसेच तलवाडा, उमापूर, चकलांबा, धोंडराई, शिरसदेवी, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, गढी येथील ६६० विद्युत ग्राहकांचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईने काही ग्राहकांनी थकबाकी भरली असून या पोटी महावितरणला ७० लाख रुपये वसुली झाली असल्याची माहिती महावितरणचे सहायक अभियंता एस.आर. सारडा यांनी दिली. (वार्ताहर)
महावितरणने ९०० थकबाकीदारांची तोडली वीज
By admin | Published: June 12, 2014 11:37 PM