वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील उघड्या केबल व ट्रान्स्फाॅर्मरकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात अप्रिय घटना घडण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.
महावितरणच्या वतीने पंधरा दिवसांपूर्वीच परिसरात मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी वीजपुरवठा बंद करुन दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. पावसाळ्यात लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, झांडाच्या फांद्याची कटाई, उघड्या धोकादायक विद्युत डीपींची दुरुस्ती आदी कामे करून घेतली आहेत; मात्र साईनगर परिसरात ठिकठिकाणी फ्यूज बॉक्समधील तसेच भूमिगत केबल उघडी पडली आहे. याचबरोबर ट्रान्स्फाॅर्मरला झाडांच्या फांद्याने वेढले असल्याने महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मान्सूनपूर्व कोणती कामे केली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
साईनगरातील उघड्या पडलेल्या केबल ठिकठिकाणी तुटल्याने ज्वाॅइंट देण्यात आले आहे. पाऊस पडल्यानंतर उघड्या केबलमधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरुन अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी उघड्या पडलेल्या केबलमुळे विजेचा शॉक लागून काही म्हशी मृत्युमुखी पडल्या होत्या. आता पावसाळा तोंडावर आला असून साईनगरातील उघड्या पडलेल्या केबलकडे तसेच विद्युत ट्रान्स्फाॅर्मरला वेढा पडलेल्या वेली व फांद्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे नागरी वसाहतीत उघड्या केबल व ट्रान्स्फाॅर्मर असल्याने लहान मुले खेळता-खेळता या ठिकाणी जात असल्याने पालकांना नेहमी सतर्क रहावे लागते, असे दत्तात्रय वर्पे, संजय जाधव, जनार्धन चिल्लारे, राजेंद्र कर्पे, सागर हनवते, प्रल्हाद सूर्यवंशी, सुंदर जगताप आदींनी सांगितले.
फोटो ओळ
सिडको वाळूज महानगरातील उघड्या केबल व ट्रान्स्फाॅर्मरकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याने पावसाळ्यात वीज प्रवाह जमिनीत उतरण्याची भीती व्यक्त होत आहे.