पैठण : पैठण नगर परिषदेचा पाणीपुरवठा व पथदिव्यांसह जायकवाडी धरणाचा विद्युत पुरवठा सोमवारी खंडित करून महावितरणने थकबाकी ठेवणाऱ्या शासकीय कार्यालयास जोरदार झटका दिला. पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पैठणकरांना मंगळवारी निर्जळीचा सामना करावा लागला. दरम्यान, जायकवाडी प्रशासनाने बिल भरणा करून विद्युत पुरवठा जोडून घेतला आहे, तर नगर परिषदेने चालू बिल भरून मंगळवारी पाणीपुरवठा चालू केला. मात्र, शहरातील स्ट्रीट लाईटचे थकीत बिल न भरल्याने पैठण शहरात मात्र अंधाराचे साम्राज्य राहणार आहे.
पैठण नगर परिषदेकडे महावितरणचे सुमारे ४ कोटींचे वीजबिल थकीत आहे. थकबाकी भरण्याबाबत नगर परिषदेला महावितरणने अनेक वेळा नोटीस बजावली. दरम्यान, शासनाकडून येणारे वित्तीय सहाय्य वेळेवर उपलब्ध न झाल्याने न.प. ने थकीत बिलाचा भरणा केला नाही. अखेर महावितरणने पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उत्तर जायकवाडी येथील पंप हाऊसचा विद्युत पुरवठा रविवारी खंडित केल्याने शहरात सोमवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली आहे. नगर परिषदेकडे स्ट्रीट लाईटचे चार कोटी रुपये, पंप हाऊसचे ३५ लाख रुपये बिल थकीत आहे. नगर परिषदेने एप्रिल महिन्यापासून पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसच्या वीज बिलाचा भरणा केलेला नाही. दरम्यान, मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी मंगळवारी १२.५० लाख रुपयांचे बिल भरून पंपहाऊसचा विद्युत पुरवठा जोडून घेतला. स्ट्रीट लाईटचे बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने महावितरणने स्ट्रीट लाईटचा वीजपुरवठा जोडण्यास नकार दिला.
---
चार वीजचोरांवर कारवाई
पैठण शहरात चार ठिकाणी ग्राहकांनी विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचे शहर अभियंता रोहित तायडे यांच्या पथकाने समोर आणले. दरम्यान, या ग्राहकांना केलेल्या वीज चोरीचे बिल देण्यात आले आहे. ७२ तासात त्यांनी बिल भरले नाही, तर त्यांच्यावर गंगापूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे अभियंता रोहित तायडे यांनी सांगितले.