पाथरी ( परभणी ) : मार्च एंड च्या तोंडावर महावितरण ने धडक वसुली मोहीम हाती घेतली आहे. यानुसार आज पहिल्या दिवशीच ८ लाख रुपयाची थकीत बिलाची वसुली झाली असून तब्बल ३५० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
पाथरी शहरात ४ हजार वीज ग्राहक आहेत. यातील बहुतांश ग्राहकांकडे वीज बिले थकीत आहेत. हा आकडा ५ कोटी रुपये एवढा आहे. याच्या वसुलीसाठी महावितरणने आज पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. यानुसार आज शहरात परभणी मंडळ कार्यालयातील १० विशेष वसुली पथके येऊन धडकली. यात तब्बल १५० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील प्रत्येक भागात या पथकाने सकाळपासून कारवाई सुरु केली. यातून जवळपास ८ लाख रुपयाची वसुली जमा झाली तर तब्बल ३५० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यासोबतच महावितरणने वीज बिल भरण्यासाठी दोन तात्पुरती केंद्रे सुरु केली आहेत. यामुळे वीज बिल भरणा केंद्राची संख्या ५ झाली आहे.