- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वीज उपकरणातील दोष, खराब वायर्स, अपघातासह वीज उपकरणे हाताळताना झालेला निष्काळजीपणा, अतिधाडस, सुरक्षा साधनांचा वापर करण्याकडे दुर्लक्ष, अशा अनेक कारणांनी विजेचा धक्का बसण्याच्या घटनांत जिल्ह्यात गेल्या २ वर्षांत तब्बल ८१ जणांना प्राण गमवावे लागले. यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या १० महिन्यांत विजेचा धक्का लागण्याच्या घटनांत विशेषत: ग्रामीण भागात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात मूक प्राण्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडल्या. गेल्या दोन वर्षांत ६७ प्राण्यांचा मृत्यू झाला. महावितरणच्या यंत्रणेतील त्रुटींबरोबर मानवी चुकांमुळे विजेचा धक्का लागून जखमी होणे, मृत्यू पावण्याच्या घटना घडत आहेत. विद्युत वाहिनी तुटणे, स्पार्किंग होणे, विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला, ताण वायरला स्पर्श होणे, अशा कारणांनी अपघाताच्या घटना घडतात. घरांमध्ये एखाद्या उपकरणाच्या माध्यमातून विजेचा धक्का लागण्याच्या घटना होतात. तर देखभाल-दुरुस्ती करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेच्या अपघाताला तोंड द्यावे लागत आहे. यात कोणी जखमी होतो, तर कोणाचा बळी जातो. गेल्या १० महिन्यांत १० जण विजेचा धक्का लागून जखमी झाले.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही शाॅकमहावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही विजेचा धक्का लागण्याच्या घटना समोर आल्या आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात विजेच्या धक्क्यामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला; तर गेल्या १० महिन्यांत महावितरणच्या एका कर्मचाऱ्याचा आणि २ आऊटसोर्सच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला; तर दोन आऊटसोर्स कर्मचारी विजेचा धक्का लागून जखमी झाले.
विद्युत सुरक्षेसंदर्भात ग्राहकांचे नियमित प्रबोधन केले जाते. नागरिकांना दर्जेदार उपकरणे वापरण्याचे आवाहन केले जात आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही सुरक्षा साधने वापरून काम केले पाहिजे. त्यांना ते अनिवार्य आहे. महावितरणच्या परवानगीशिवाय विद्युत यंत्रणेजवळ कोणीही जाता कामा नये.- महावितरण
४ लाख रुपयांची मिळते आर्थिक मदत१) महावितरणच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यासंदर्भात नियमानुसार देय, मदत, तातडीची मदत केली जाते. त्याबरोबर मृताच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नाेकरी दिली जाते.२) वीज ग्राहक, नागरिकाचा महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झाला, तर ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.३) विजेच्या धक्क्याने मृत पावणाऱ्या प्राण्यांसाठीही आर्थिक मदत दिली जाते. पण ही मदत कितीजणांना मिळाली, ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
वर्ष मनुष्यबळी मदत मिळाली पशुहानी मदत मिळाली२०१९-२० - ३५ माहिती उपलब्ध नाही ३४ माहिती उपलब्ध नाही
२०२०-२१ (जानेवारीपर्यंत)- ४६ माहिती उपलब्ध नाही ३३ माहिती उपलब्ध नाही