औरंगाबाद : क्रीडा भारतीतर्फे आयोजित विविध खेळांच्या क्रीडा महोत्सवास आज प्रारंभ झाला. या महोत्सवांतर्गत मल्लखांब स्पर्धेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा संघ अजिंक्य ठरला. धर्मवीर संभाजी विद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात मुकुल मंदिर शाळेने अजिंक्यपद पटकावले. फाऊंडेशन स्कूलचा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत एकूण ७ संघांनी सहभाग नोंदवला.मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन एन-५ येथे शिवाजी दांडगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विजय खाचणे, पंकज भारसाखळे, बिपीन राठोड यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते. मल्लखांब स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनायक राऊत, गणपत पवार, प्रशांत जमधडे आदींनी परिश्रम घेतले.रस्सीखेच स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलचा संघ अव्वल ठरला. स्प्रिंग डेल्स शाळेने उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांच्या हस्ते झाले़ यावेळी भाऊसाहेब वाघ, प्राचार्या गीता दामोधरण, वाकोडे, संदीप जगताप, गोकुळ तांदळे, डॉ. प्रदीप खांड्रे उपस्थित होते. या स्पर्धेत ६ संघानी सहभाग नोंदविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहिदास गाडेकर, रूपा शर्मा, श्रीराम गायकवाड, समाधान बेलेवार आदींनी परिश्रम घेतले. सहकारनगर येथील मनपाच्या सभागृहात झालेल्या ज्युदो स्पर्धेत १४0 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ज्युदो स्पर्धेचे उद्घाटन डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वास जोशी उपस्थित होते.
मल्लखांब स्पर्धेत एमएसएम चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:51 AM