औरंगाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ९८४ रुग्ण आढळले. त्यापैकी ५८१ रुग्ण बरे झाले. उपचारादरम्यान ११३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २८ जणांनी एका डोळ्याची दृष्टी गमावली. सहा जणांना डोळे काढावे लागले. कोरोनाचा कहर कमी होत असल्याने आता म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर असल्याने काहीसा दिलासा व्यक्त होत असून, सध्या जिल्ह्यातील २९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना झाल्यावर मधुमेही रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता त्या रुग्णांची रक्तातील साखरेचे प्रमाण आणि प्रतिकारशक्तीवर अवलंबून आहे. ज्या रुग्णांची रक्तातील साखर जास्त आहे. सोबतच कोरोनाबाधित असताना जास्त प्रमाणात स्टेराॅईडचा झालेला वापरावर म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता जास्त असते. आजारावर ॲम्फोटेरेसिन बी, आजार वाढलेला असेल तर तो भाग काढून टाकण्याची नाकाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. ही उपचार प्रक्रिया वेळ खाऊ, महागडी आणि गुंतागुंतीची आहे. घाटीत डाॅ. सुनील देशमुख, डाॅ. शुभा घोणशीकर, डाॅ. वसंत पवार, डाॅ. शैलेश निकम, डाॅ. महेंद्र कटरे, यांची टीम शस्त्रक्रियांची शंभरी पुढील दोन दिवसांत पूर्ण करतील. दररोज १० ते १२ रुग्ण भरती होण्याचे प्रमाण ६ जूनपासून ५ ते ६ वर पोहोचले आहे. कोरोनानंतर आणि कोरोनासोबत होणा-या आजाराचे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. तर ३० टक्के रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहे. कोरोनाचा आलेख खालावत असताना जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्णही कमी होत असल्याचे घाटीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
२८ जणांचा एक डोळा निकामीघाटीत रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ९६ शस्त्रक्रिया जानेवारीपासून आतापर्यंत केल्या गेल्या. त्यापैकी ६८ रुग्ण बरे होऊन घरी परते. तर आयसीयूतील कोरोनासह म्युकरमायकोसीस असलेल्या ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २८ जणांना एका डोळ्याची नजर गमवावी लागली. आतापर्यंत १९९ रुग्ण घाटीत म्युकरमायकोसिसचे दाखल झाले. त्यापैकी केवळ ३६ रुग्ण औरंगाबादेतील असून सध्या ९० रुग्णांवर उपचार सुरू आहे. जालना, नगर, बुलडाणा, जळगाव येथील सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातही ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश अधिक आहे, असे घाटीतील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. घोणशीकर म्हणाल्या.
औषधींचा पुरवठा काहीसा सुरळीतम्युकरमायकोसिसवरील औषधींचा कोटा मुंबईहून येतो. त्या उपलब्ध औषधींतून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णांना प्राधान्याने एक, दोन, तीन इंजेक्शनचे डोस साठा उपलब्धतेनुसार दिला जातो. त्यानंतर उरलेल्या औषधांतून खासगी रुग्णांलयांना पैसे आकारून दिला जातो. सध्या रुग्ण कमी झाल्याने आवश्यकतेनुसार औषधांचा साठा मिळत असल्याने अडचण येत नसल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
कोरोनासह म्युकरमायकोसिस गुंतागुंतीचाम्युकरमायकोसिस नाकापर्यंत असला तर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचे प्रयत्न आहेत. दररोज घाटीत पाच ते सहा शस्त्रक्रिया कान नाक घसा, नेत्ररोग आणि बधिरीकरण विभागाचे तज्ज्ञ मिळून करत आहेत. या उपचाराची प्रक्रिया खूपच वेळ खाऊ आहे. ३ ते ६ महिने लागतात. त्यात कोरोना, मधुमेह, किडनी विकार आदी एकाच वेळी असल्यास त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी फिटनेसला अडचणी येत असल्याचे ४० टक्केच शस्त्रक्रिया होऊ शकल्या. शक्य त्या शस्त्रक्रिया गतीने करण्याचा प्रयत्न असल्याचे नेत्ररोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शुभा झंवर यांनी सांगितले. तर जिल्ह्यात आतापर्यंत ६ जणांचा एक डोळा काढावा लागला असल्याचे आरोग्य विभगााकडून सांगण्यात आले.
ही घ्या काळजी :म्युकरमायकोसीसचे प्रमाण कोरोना झालेल्या रुग्णांपैकी जवळपास १ टक्का आहे. वेळेत निदान आणि उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बराही होतो. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना डोकेदुखी, चेह-यावर सूज, नाक बंद पडणे, नाकातून काळ्या खपल्या येणे, डोळ्यावर सूज येणे, ताप येणे ही लक्षणे दिसत असतील तर त्यांनी वेळेत औषधोपचार घेतल्यास बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. असे आंतरग्रंथी तज्ज्ञ डाॅ. नीलेश लोमटे यांनी सांगितले.
योग्य काळजी व उपचार घेणे गरजेचेजिल्ह्यात सध्या २९० म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने म्युकरमायकोसिसचे रुग्णही कमी होत आहे. मात्र, योग्य काळजी व उपचार घेणे गरजेचे आहे. औषधांची उपलब्धता केल्या जात असून लक्षणे दिसल्यास उपचाराला उशीर करू नये.- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक औरंगाबाद
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण -९८४सध्या उपचार सुरू -२९०बरे झालेले रुग्ण -५८१म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू -११३