लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नव्या विमानसेवेला आॅक्टोबरमध्ये मुहूर्त मिळणार आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी चाचपणी करणाºया तीन विमान कंपन्यांपैकी दिल्ली- औरंगाबाद सेवेसाठी झूम एअरची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आॅक्टोबरपासून ही सेवा सुरू होऊ शकते. यास विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी दुजोरा दिला.विमानतळावरून या वर्षाच्या अखेरपर्यंत किमान तीन नव्या विमान कंपन्यांची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.यामध्ये दिल्ली, मुंबईसाठी विमान कंपन्यांकडून विशेष करून चाचपणी करण्यात आली आहे. औरंगाबाद-मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी डेक्कन चार्टर्स या कंपनीने पुढाकार घेतला आहे, तर दिल्ली-औरंगाबाद सेवेसाठी झूम एअरने प्रस्ताव दिला, तसेच इंडिगो कंपनीच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात विमानतळास भेट देत सोयी-सुविधांची पाहणी केली होती. यामध्ये झूम एअरची आता सेवा सुरू करण्यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.विमानतळावरून गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत स्पाइस जेटची औरंगाबाद-दिल्ली विमान सेवा बंद झाली, तर ट्रूजेट कंपनीतर्फे २५ जुलै २०१५ पासून औरंगाबाद-हैदराबाद-तिरुपती विमानसेवा सुरू करण्यात आली. आजघडीला एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीच्या विमानसेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. मागील दोन वर्षांपासून विमानतळावरून नवीन विमानसेवा सुरू करण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यास आता यश मिळत असल्याचे दिसते. या वर्षाच्या अखेरपर्यंत झूम एअरसह किमान तीन विमान कंपन्यांची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
नव्या विमानसेवेला आॅक्टोबरमध्ये मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:04 AM