फुलंब्री (औरंगाबाद): अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला पकडले असता वाळूतस्करांनी तलाठ्यास धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी रात्री तालुक्यातील निमखेडा येथील गिरजा नदीच्या पुलावर घडली. या प्रकरणी वडोदबाजार पोलीस स्टेशनमध्ये चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तलाठी सुरज राजपूत, तलाठी अनिल हुगे, तलाठी भगवान ढोरमारे यांचे पथक सोमवारी रात्री निमखेडा जिवरग टाकळी पुलावर होते. यावेळी अवैधरीत्या उत्खनन करून वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पथकाने अडवले. यावेळी काही जणांनी तलाठ्यास ट्रॅक्टर समोरून बाजूला ओढत धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करत ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी भाऊसाहेब शांताराम जिवरग, विठठल आबाराव वाहटुळे, आकाश विठठल वाहटुळे ( टाकळी ता. सिल्लोड), भिकन गणपत फुके ( रा. निमखेडा तालुका फुलंब्री ) यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की करणे या कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडोदबाजार हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत आहे. या प्रकाराला पोलीसांकडून अभय मिळत आहे. यामुळेच वाळू तस्कर असे धाडस करीत आहेत अशी चर्चा आहे. गिरीजा नदीच्या पात्रातून दररोज हजारी ब्रास वाळूची अवैध वाहतूक दररोज केली जात आहे. पण पोलीसांकडून कारवाई होताना दिसत नाही.