औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात दोन वर्षांपासून शहर बस धावत आहे. १०० बससाठी महापालिकेला स्वतंत्र डेपोची गरज भासत आहे. मुकुंदवाडी येथील एस.टी. महामंडळाची अडीच एकर जागा नाममात्र भाडेतत्त्वावर देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकतीच मान्य केली. महापालिकेला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच एनओसी मिळेल, असा विश्वास पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केला.
शहरात सध्या शंभर बस सुरू आहेत. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बस उभ्या करण्यासाठी व त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला डेपोसाठी जागा हवी आहे. मुकुंदवाडी येथील एसटी महामंडळाची जागा निवडण्यात आली. महामंडळाने ही जागा ताब्यात द्यावी, यासाठी प्रयत्न केले जात होते. दोन बैठकाही झाल्या. एक बैठक मुंबईत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाली होती. या बैठकीतही महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जागेचे एनओसी देण्याचे मान्य केले होते, पण अद्याप एनओसी दिले नाही.
काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब औरंगाबादेत आले होते. त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय व अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठक सुरू असताना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी परब यांना फोनवरून जागेची एनओसी देण्याबद्दल सूचना केली. परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्या जागेचे एनओसी देण्याबाबत आदेशित केले. त्यामुळे येत्या काही दिवसांत पालिकेला त्या जागेचे एनओसी मिळेल, असा विश्वास आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केला.
मनपा साडेतीन कोटी माफ करणार
एस.टी. महामंडळाला अद्ययावत बसस्थानक बांधायचे आहे. त्यासाठी प्रस्तावही मनपाकडे आला आहे. बांधकाम परवानगीवरील विकास शुल्काची रक्कम साडेतीन कोटी रुपये होत आहे. महापालिका ही रक्कम माफ करण्यास तयारही आहे. जागा द्यावी दुसऱ्याच दिवशी विकास शुल्क माफ करून प्रस्ताव न्यावा, असेही पांडेय यांनी नमूद केले.