मुंबई : एअर इंडिया आणि भोंगळ कारभार हे जणू समानार्थी शब्दच झाले आहेत. त्यांच्या नियोजनशून्यतेची अनेक उदाहरणं आपण ऐकतो, वाचतो. याच ढिसाळ कारभाराचा अनुभव आज मुंबई-औरंगाबाद (AI 442) विमानातील प्रवाशांना आला. तांत्रिक बिघाडामुळे उ्डडाण अर्धा तास उशिराने होईल, अशी उद्घोषणा पायलटने केली. पण, पुढचे तब्बल दोन तास विमान जागच्या जागी उभं होतं आणि प्रवासीही कुठल्याही सूचनेविना ताटकळत बसले होते. आता दुसरे विमान ६.५० वाजता उड्डाण करणार असल्याने प्रवाशांना चार तास विमानतळावरच थांबावे लागले आहे.
मुंबई-औरंगाबाद विमानाची नियोजित वेळ दुपारी ३.२५ ची होती. त्यानुसार, ३.१० वाजता प्रवाशांना विमानात प्रवेश देण्यात आला. सगळे जण स्थिरस्थावर होतात न होतात, तोच विमानात तांत्रिक बिघाड असल्याची उद्घोषणा पायलटने केली. विमानाचे वायपर नादुरुस्त झाल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळे ४ वाजेपर्यंत विमान टेक-ऑफ करेल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, सव्वा पाच वाजले तरी विमान जागेवरून हलले नाही. नेमकं काय झालंय, हे सांगण्याचं सौजन्यही कुणी दाखवलं नाही. उलट, ग्राउंड स्टाफ आणि फ्लाईट स्टाफ यांच्यातच खटके उडत होते. नियोजनाचा पूर्णपणे अभाव होता. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. संतापलेल्या प्रवाशांनी याबाबत वैमानिक व केबिन क्रू ना जाब विचारल्यावर साडेपाच वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या विमानातून औरंगाबाद प्रवास करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.
हे दुसरे पर्यायी विमान आता ६.५० वाजता उड्डाण करणार असल्याने प्रवाशांना एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल चार तास विमानतळावरच ताटकळत बसावे लागणार आहे. एअर इंडियाच्या या कारभाराबाबत प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दुसऱ्या घटनेत, एअर इंडियाच्याच दुपारी २.४५ वाजता भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला देखील विलंब झाल्याचे समोर आले आहे. हे विमान भोपाळहून दिल्ली जाण्यासाठी हे विमान भोपाळमध्ये आलेले नसल्याने प्रवासी विमानतळावर रखडले आहेत. हे विमान तांत्रिक अडचणींमुळे रात्री १० वाजता येईल, अशी माहिती व्यवस्थापकाने सुरुवातीला दिली होती. मात्र नंतर हे उड्डाण रद्द केल्याची माहिती प्रवाशांना देण्यात अली. विमानातून प्रवास करणाऱ्या ८० पेक्षा जास्त प्रवाशांना इतर ठिकाणी जायचे असल्याने त्यांचा पुढील विमान प्रवास देखील बारगळला आहे. प्रशासनाने पर्यायी विमानाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.