- विकास राऊतऔरंगाबाद : मुंबई-नागपूर अतिजलद रेल्वेच्या (एमएनएचएसआर) कामाचा ( Mumbai-Nagpur high speed railway) नारळ नवीन वर्ष २०२२ मध्ये फुटण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या कामासाठी मार्च २०२१ मध्ये लीडर भूसर्वेक्षणास (लाईट डिटेक्शन ॲण्ड रेंजिंग- टोपोग्राफिक सर्व्हे फाॅर बुलेट ट्रेन) सुरुवात झाली होती. ते काम जवळपास संपले असून डीपीआरचे (सविस्तर प्रकल्प अहवाल) काम अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे काॅरिडॉरसाठी डीपीआर करण्यासाठी लीडर सर्वेक्षण करण्यात आले. या तंत्रज्ञानाने जमिनीचा तपशील संकलित करण्यासाठी साधारणत: ५ महिन्यांचा कालावधी लागला. पूर्वी हे काम करण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागायचा. ७३६ कि.मी. अंतरात लेझर डेटा, जीपीएस डेटा, फ्लाईट पॅरामीटर्स आणि छायाचित्रांचे संकलन करण्याचे काम संपले आहे. जमीन, पायवाटा, रस्ते, वृक्ष यांची छायांकित माहिती सर्वेक्षणातून संकलित केली आहे. मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे (एमएनएचएसआर) औरंगाबाद येथूनच विभागीय नियंत्रण होणार आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून सुविधायुक्त कार्यालय तयार ठेवले आहे. या कामासाठी जपान येथील तंत्रज्ञांचे शिष्टमंडळ नववर्षात येणार आहे.
हाय स्पीड रेल्वेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर रिजनल कमांड सेंटर (प्रादेशिक नियंत्रण केंद्र) सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र दालन देण्यात आले आहे. जिल्ह्यात हाय स्पीड रेल्वेचा १११ कि.मी. ट्रॅक निर्माण करण्यात येणार असून समृध्दी महामार्गालगत समांतरपणे त्या ट्रॅकची बांधणी होईल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे काॅपोर्रेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून कमांड कंट्रोल सेंटर सुरू होणार असल्याने लवकरच डीपीआरनुसार काम हाती घेण्यात येणार आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, कंत्राटदार नेमणे याची माहिती २०२२ मध्ये समोर येईल. एमएनएचएसआरचे राहुल रंजन यांनी सांगितले, लीडर सर्व्हेचे काम संपले असून डीपीआरचे कामही झाले आहे. यापुढील निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील.
इतर कामांसाठी पाठपुरावा सुरूजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, नवीन वर्षांत हाय स्पीड रेल्वेच्या कामाला सुरुवात होणे शक्य आहे. रेल्वेच्या इतर कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्थानिक आहेत. त्यामुळे कामांना गती मिळेल. हायस्पीड रेल्वेच्या कामासाठी पहिले कार्यालय औरंगाबादेत सुरू केले आहे.