औरंगाबाद : मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मदतीची मागणी केली आहे. या मागणीला विद्यापीठाच्या अधिकाºयांनी तात्काळ होकार दिल्यामुळे मुंबई विद्यापीठाचे अधिकारी सोमवारी विद्यापीठात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतला. मात्र, हा निर्णय पूर्णपणे अंगलट आला आहे. चार महिन्यांपासून बहुतांश अभ्यासक्रमांचे निकाल रखडले आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाइन दिली होती. ही डेडलाइन पाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नागपूर, पुणे आणि औरंगाबादेतील विद्यापीठाकडे आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्याची विनंती केली होती. नागपूर, पुण्याच्या विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली. मात्र, औरंगाबाद विद्यापीठात तांत्रिक अडचणींमुळे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी डाऊनलोड झाल्याच नाहीत. या तांत्रिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. यामुळे मुंबई विद्यापीठाचे अधिकारी ३० जुलै रोजी मुंबईकडे रवाना झाले. राज्यपालांनी दिलेली डेडलाइन हुकली. यानंतर ५ आॅगस्टची डेडलाइन मिळाली. तीसुद्धा पाळता आली नाही. शेवटी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांचा पदभार कोल्हापूरच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला.
मुंबई विद्यापीठाची पुन्हा औरंगाबादकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:15 AM