औरंगाबाद : औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’च्या बळींची आता शतकाकडे वाटचाल सुरू आहे. औरंगाबादेत आतापर्यंत ८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७६७ आहे. सुदैवाने यातील ३५५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या ३३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोविडसंदर्भातील शासनाच्या संकेतस्थळावर म्युकरमायकोसिस रुग्णांची ज्या प्रमाणात माहिती नमूद केली जाते, त्या आकडेवारीच्या आधारावरच शासनाकडून आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. त्यासाठी शासकीय संकेतस्थळावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती नियमितपणे अपडेट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने रुग्णालयांकडून उपचार घेणाऱ्या आणि मृत्यू पावलेल्या रुग्णांची माहिती संकलित करून अपडेट केली जात आहे. या संकेतस्थळावर आतापर्यंत ८० रुग्णांचा ‘म्युकरमायकोसिस’ने मृत्यू झाल्याची माहिती नमूद केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
सध्या जेवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, त्यापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेऊन परतले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दिलासाही व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (औषध) सहआयुक्त संजय काळे म्हणाले, म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले इंजेक्शन डिस्ट्रिब्युटर, खाजगी रुग्णालयांकडे येत नाही. आरोग्य विभागाकडूनच ही इंजेक्शन येतात आणि त्यांच्यामार्फतच वितरित होत आहेत.
४ दिवसांत मृत्यू ५३ वरून ८० वर
औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’ने ५३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती २८ मे रोजी आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली होती. अवघ्या ४ दिवसांत ही संख्या ८० वर गेली आहे. या ४ दिवसांत २७ मृत्यूची नोंद झाली आहे.
-----
‘म्युकरमायकोसिस’ची स्थिती
- एकूण रुग्ण - ७६७
- बरे झालेले - ३५५
- उपचार सुरू असलेले - ३३२
- उपचार करणारी रुग्णालये - २०