औरंगाबाद : महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून चतुर्थश्रेणी पदावर काम करणाऱ्या कमलबाई अंभोरे आणि विजय मल्हारी अंभोरे यांना थेट बडतर्फ करण्याचा निर्णय सोमवारी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी घेतला. अंभोरे दाम्पत्याने मनपाच्या आस्थापनेला बोगस जन्म प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आयुक्तांनी कारवाई केली.महापालिकेच्या वॉर्ड ‘ड’ कार्यालयात कमलबाई विजय अंभोरे चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा जन्म १९६४ मध्ये झालेला आहे. महापालिकेच्या आस्थापना विभागाकडे नोकरीस लागल्यानंतर अंभोरे यांनी शाळेचे प्रमाणपत्र जोडले. या प्रमाणपत्रात जन्म १९६७ मध्ये झाल्याचे नमूद केले आहे. कमलबाईचा नवरा विजय मल्हारी अंभोरे हेसुद्धा महापालिकेच्या मालमत्ता विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. विजयचा जन्म ९ मे १९५६ मध्ये झालेला आहे. त्यानेही मनपाकडे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सादर केले. त्यात जन्म १९६७ झाल्याचे नमूद केले होते. या प्रकरणात महापालिकेतील निवृत्त उपायुक्त अंभोरे यांनी लेखी स्वरूपात अंभोरे दाम्पत्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. प्रशासनाने या प्रकरणात सविस्तर चौकशी केली. पोलीस चौकशीही केली. आस्थापना विभागाने आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना अहवाल सादर केला. आयुक्तांनी अहवालाच्या आधारावर अंभोरे दाम्पत्याला थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा या निर्णयावर सह्या झाल्याचे सूत्रांनी नमूद केले.
मनपातील अंभोरे दाम्पत्य बडतर्फ
By admin | Published: May 31, 2016 12:31 AM