लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्यावर सोपवला़ रविवारी झालेल्या बैठकीत पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांनी सन्मानजनक आघाडी होत असेल तरच आघाडी करावी अन्यथा स्वबळावर लढावे अशी मते मांडली़राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाने आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच तिकिटे द्यावेत, तिकीट वाटपात अन्याय होऊ नये याची खबरदारी घेताना काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय झाल्यास ती सन्मानजनक पद्धतीने व्हावी असेही सांगितले़ कार्यकर्त्यांची मते ऐकल्यानंतर डॉ़ कदम यांनी आघाडीचा निर्णय हे जिल्हा प्रभारी धनंजय मुंडे व माजी मंत्री कदम हे घेतील असे स्पष्ट केले़ वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याचीही पक्षाची तयारी असल्याचे ते म्हणाले़ महापालिका निवडणूक राष्ट्रवादी संपूर्ण ताकदीनिशी लढणार आहे़ कार्यकर्त्यांनीही तितक्याच जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले़ बैठकीस शहर जिल्हा कार्याध्यक्ष जीवन पाटील घोगरे, प्रदेश उपाध्यक्ष अॅड़ महंमदखान पठाण, मनपा गटनेत्या डॉ़ शीलाताई कदम, शहराध्यक्ष फेरोज लाला, शहराध्यक्षा कृष्णा मंगनाळे, श्रद्धा चव्हाण, मुजाहीद खान, रामनारायण बंग, भरत काकडे, प्रकाश कामळजकर, जयश्री जिंदम, विलास गजभारे, युनूस खान, प्रकाश मुराळकर, अजीज कुरेशी, सारिका बच्चेवार, रेखा शिंदे, सरफराज अहमद आदींची उपस्थिती होती़
आघाडीचा निर्णय मुंडेंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:36 AM