प्रताप नलावडे ,बीडजिल्ह्याच्या राजकीय समिकरणात मोठा फेरबदल करीत विधानसभा निवडणुकीच्या निकालाने रा.कॉ. ला जोरदार धक्का दिला आहे तर याचवेळी भाजपाच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझेही टाकले आहे. मतदारांनी रा.कॉ. ला आता खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करायला लावले असून याचवेळी भाजपाला आत्मभान राखण्याचीही गरज आहे. जिल्ह्यातील निकालाकडे पाहिले तर या सगळ्या निकालावर गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय होणाऱ्या निवडणुकीतही त्यांचाच प्रभाव राहिला. मुंडे यांच्यासाठीच एक मत कमळाला, अशीच जिल्ह्यातील मतदारांची मानसिकता राहिली. मतदारांचा सर्वच मतदारसंघातील भाजपाच्या दिशेने झुकलेला निर्णायक कौल हा मोदी लाटेपेक्षाही गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभुतीच्या लाटेचा परिपाक म्हणावा लागेल. ही संपूर्ण निवडणूकच या ना त्या कारणाने मुंडे यांच्या भोवतीच सतत फिरत राहिली. त्यांच्या निधनानंतरही बीड जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव सातत्याने जाणवत राहिला. भाजपाने मुंडे यांचे जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न आणि त्यांनी आजवर केलेल्या कामाची प्रभावी मांडणी करीत आपला प्रचार पुढे रेटला तर बीडमध्ये शिवसेनेने त्यांचे छायाचित्र प्रचारात वापरले. रा.कॉ. च्या नेत्यांनी सभेतून मुंडे यांची भाजपात कशी गोची होत होती, हे सांगत कोणत्या का कारणाने होईना परंतु त्यांचा उल्लेख केलाच.
निवडणुकीत जाणवला मुंडे यांचाच बोलबाला!
By admin | Published: October 21, 2014 12:20 AM