औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद जिल्हा संपर्कप्रमुखपदी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी येथील बैठकीत पक्षकार्याचा आढावा घेताना कोणकोणते कार्यकर्ते तसेच ग्रामीण आणि शहरी भागातून किती कार्यकर्ते आले याचा स्थानिक नेत्यांना जाब विचारला. संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा वेगळाच परिचय यानिमित्ताने कार्यकर्त्यांना झाला. यापूर्वीचे संपर्कप्रमुख आ. राजेश टोपे यांना हटवून पक्षाने ही जबाबदारी मुंडे यांच्याकडे दिली आहे. मराठवाड्याच्या राजधानीच्या ठिकाणी पक्ष बळकट आणि भक्कम करण्याची जबाबदारी मुंडे यांच्यावर असणार आहे. संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा सोमवारी पहिलाच दौरा झाला. पक्षनेते शरद पवार यांच्या उपस्थितीत १६ मे रोजी होणाऱ्या दुष्काळी परिषदेच्या तयारीच्या बैठकीस ते आले होते. यावेळी त्यांनी कोणकोणते पदाधिकारी, तालुकाध्यक्ष बैठकीस आले आहेत त्यांना हात उंचावयाला सांगितले. शहरी भागातून किती व ग्रामीण भागातून किती कार्यकर्ते आले याचा त्यांनी आढावा घेतला. असा प्रत्यय कार्यकर्त्यांनाही पहिल्यांदाच आल्याने तेही अचंबित झाल्याचे दिसले. या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय, प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे, शहर कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, माजी आमदार संजय वाघचौरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता चव्हाण, शहराध्यक्षा मेहराज पटेल, युवक अध्यक्ष अभिषेक देशमुख, नगरसेविका अंकिता विधाते, कमाल फारुकी, वीणा खरे, छाया जंगले, शेख इसाक पटेल, सूरजितसिंग खुंगर, विलास चव्हाण, प्रतिभा वैद्य आदी उपस्थित होते.
मुंडे यांनी घेतला पक्षकार्याचा आढावा
By admin | Published: May 10, 2016 12:40 AM