औरंगाबाद : मागीलवर्षी अतिवृष्टीचा फटका कृषी उत्पादनाला बसल्याने वर्षभर डाळींच्या भावात चढ-उतार होत राहिला. मात्र, आता ऐन नवीन आवक होण्याच्या तोंडावर मूग डाळ, उडद डाळीच्या किमतीने शंभरी पार केली. यामुळे भल्या-भल्यांचे अंदाज चुकले आहेत.
किराणा दुकानातील फलकावर नजर टाकली, तर लक्षात येईल की, डाळी किती महागल्या आहेत. उडीद डाळ व मूग डाळ १०२ ते १०४ रुपये प्रतिकिलो विकत आहेत. त्यापाठोपाठ आता तूर डाळ शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. ही डाळ ९४-९६ रुपये किलोने खरेदी करावी लागत आहे. त्यातुलनेत हरभरा डाळीच्या भावात जास्त वाढ झालेली नाही. ती ६२ ते ६४ रुपये किलोने विकत आहे, यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात नवीन मूग व उडीद बाजारात येणार आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याच्या बातमीमुळे मागील आठवड्यात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली.
चौकट
लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक महाग
लॉकडाऊन काळात डाळी सर्वाधिक महाग दरात विकण्यात आल्या होत्या. एप्रिल २०२० मध्ये हरभरा डाळ चक्क १२० रुपये किलोने विकली गेली होती. तूरडाळ १३५ रुपये, मूगडाळ १३८ रुपये, तर उडीद डाळ १४० रुपयांनी विकण्यात आली होती. अनलॉकनंतर डाळीचे भाव उतरले होते. पण आता पुन्हा एकदा डाळींनी शंभरी गाठून महागाई आणखी वाढविली.
चौकट
डाळींचे भाव
डाळ। १ मार्च २०२० १ मार्च २०२१
हरभरा डाळ ५६-५८ रु. ६२-६४ रु.
तूर डाळ ८०-८४ रु. ९४-९६ रु.
मूग डाळ ९४-९६ रु. १०२-१०४ रु.
उडीद डाळ ९०-९२ रु. १०२-१०४ रु.
चौकट
आवक वाढली तरच मंदी
नवीन मूग व उडदाची आवक एप्रिल महिन्यात सुरू होत आहे. आवक वाढली तरच डाळीचे भाव कमी होतील. नाही तर भाव स्थिर राहतील.
- नीलेश सोमाणी
व्यापारी