औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे; पण नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे. औषधी आणि कीटस्देखील पुरेशा आहेत, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिली.
कोरोनाची लाट ओसरताच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनासाठी उभारलेली यंत्रणा बंद केली होती. औरंगाबाद शहरात कोविड केअर सेंटर्समधून ४ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था आजही कार्यरत आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये २ हजार बेडची व्यवस्था केली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून डॉक्टर्स, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या ३० जानेवारीअखेरपर्यंत कायम राहतील, त्यात कपात केली जाणार नाही, असा उल्लेख त्यांनी केला.
औरंगाबाद जिल्ह्याची एकत्रित माहिती देताना पाण्डेय म्हणाले, जिल्ह्यात ५४४ आयसीयू बेड आहेत, त्यापैकी सध्या ५२३ बेड रिकामे आहेत. २०९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून, त्यापैकी १९९ व्हेंटिलेटर्स रिकामेच आहेत. १७५५ ऑक्सिजन बेड आहेत. त्यापैकी १७०७ बेड रिकामे आहेत. जिल्हाभरात कोविड केअर सेंटर्समधून ६७०४ बेड आहेत. त्यांच्यापैकी ६७४४ बेडस् रिकामे आहेत. त्यामुळे आवश्यक ती पायाभूत सुविधा तयार आहे, मनुष्यबळदेखील आहे. औषधी आणि ऑक्सिजनदेखील पुरेसा आहे. २६४७० पीपीई कीटस्, ६८ हजार एन-९५ मास्क उपलब्ध आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे कीटस्देखील पुरेसे आहेत आणि आता ९० टक्के चाचण्या आरटीपीसीआर पद्धतीच्याच केल्या जाणार आहेत. बाहेरगावाहून वाहनाने येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे आता शक्य होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर तपासणी सुरू केली आहे.