औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी सर्व्हिस रोडच्या प्रश्नावर नागरिकांनी जोरदार आवाज उठविल्याने सार्वजनिक बांधकाम, मनपा तसेच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली होती; परंतु अपघात रोखण्यासाठी पोलीस तेवढे वाहने थोपवून धरत आहेत. मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्व्हिस रोडचा चक्क विसर पडला आहे.
बायपास रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता सर्व्हिस रस्ता तयार करणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर आपली जबाबदारी ढकलून देत आहे. त्यात नागरिकांना मात्र सतत गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर फलक लावून दिशादर्शक, पांढरे पट्टे आदी कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होते; परंतु अद्याप रस्त्याचे साईड पंखे भरण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी थातुरमातुर मुरूम तेवढा टाकला आहे. खड्डे बुजविले असले तरी महानुभाव आश्रम चौक ते देवळाई चौकापर्यंत कुठेही पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाही.
वाहतूक कोंडी कायमथोपविलेल्या जड वाहनांचा लोंढा एकदाच सुटल्याने दुचाकीस्वार व स्कूल व्हॅनचालकांना रस्ता ओलांडणे म्हणजे अपघातास निमंत्रणच ठरते आहे. पोलीस यंत्रणेने लोखंडी बॅरिकेट लावून वाहनांना थोडीफार शिस्त लावण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहतुकीला सवय लागेपर्यंत पोलिसांचा प्रयत्न असाच सुरू ठेवावा म्हणून सातारा-देवळाई संघर्ष समितीचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर लागणारी आवश्यक साधणे उपलब्ध करून दिली नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अतिक्रमणाला विराम किती दिवसच्बायपासवरील अपघात टळले असे म्हणता येत नाही. नुकताच एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. पादचाऱ्याला दत्तमंदिराजवळ दुचाकीस्वाराने धडक देऊन तो स्वत:ही जखमी झाल्याचा प्रकार घडलेला आहे. च्जड वाहने सिंगल लाईनमधून चालत नाही. तीन लेनचा अख्खा रस्ता ते व्यापतात. त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारींना डांबरी रस्त्यावरून खाली उतरावे लागते. त्यामुळे घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी सर्व्हिस रोड बनवावा, अशी मागणी राजू राठोड, पद्मसिंग राजपूत, माजी ग्रा.पं. सदस्य विठ्ठल काळे, राजू नरवडे आदींनी केली आहे.