नांदेड : महापालिका अधिकाऱ्यांच्या मनमानीविरूद्ध बिल कलेक्टरनी एकत्र येत उद्या गुरूवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे़ मालमत्ता कराची कमी वसुली झाल्याचा बिल कलेक्टरवर ठपका ठेवण्यात येत असला तरी अधिकाऱ्यांची भूमिका कमी वसुलीसाठी कारणीभूत असल्याचे बिल कलेक्टरने स्पष्ट केले आहे़महापालिकेची करवसुलीसंदर्भात १४ मार्च रोजी झालेल्या बैठकीत सर्व बिल कलेक्टर, कर निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या होत्या़ या नोटीससंदर्भात १५ मार्च रोजी बिल कलेक्टरनी एकत्र येत प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध केला़ तसेच थकित असलेलं तीन महिन्यांचे वेतन देण्याची मागणी केली़ हे वेतन २१ मार्चपर्यंत न दिल्यास आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्धारही केला होता़ या बैठकीची माहिती बुधवारी मनपा अधिकाऱ्यांना मिळताच काही बिल कलेक्टरना हजर होण्याचे फर्मान सोडण्यात आले़ त्यांना चांगलेच फैलावरही घेतले़ परिणामी सोमवारपासून अपेक्षित असलेले आंदोलन उद्या गुरूवारपासूनच सुरू होणार आहे़ महापालिका बिल कलेक्टरनी बुधवारी महापौर शैलजा स्वामी यांना निवेदन देताना आपले थकित वेतन देण्याची मागणी केली़ त्याचवेळी आयुक्त सुशील खोडवेकर आणि उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या हिटलरशाही धोरणाचाही पाढा वाचला़ मनपा बिल कलेक्टरचे थकित वेतन देईपर्यंत आणि इतर विषय मार्गी लागेपर्यंत १७ मार्चपासून बिल कलेक्टर करवसुलीसाठी कोणत्याही वॉर्डात जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ उद्या १७ मार्च रोजी मनपा बिल कलेक्टर मुख्यालयापुढे निदर्शने करणार आहेत़ त्यामुळे ऐन मार्चच्या उत्तरार्धात बिल कलेक्टरचे आंदोलन हे मनपाला आणखीनच आर्थिक संकटात लोटणारे ठरणार आहे़ (प्रतिनिधी)
मनपा बिल कलेक्टर, प्रशासन आमनेसामने; आजपासून कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 12:09 AM