औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका २३ डिसेंबरपासून शहर बस सेवा सुरू करणार आहे. एस.टी. महामंडळाच्या सहकार्याने बससेवा सुरू होणार असली तरी मनपा उद्यापासून बसची मार्केटिंग शहरात करणार आहे. गर्दीच्या ठिकाणी बस सजवून ठेवण्यात येईल. तब्बल आठ दिवस हा उपक्रम सुरू राहणार आहे. बससेवेच्या लोकार्पण सोहळ्याला फक्त सात दिवस शिल्लक असताना शहर बससाठी लागणारे स्थानके धुळीत माखलेली आहेत. त्यांची साफसफाई, डागडुजीही करण्याची तसदी महापालिकेने घेतली नाही.महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी सांगितले की, टाटा कंपनीकडून मनपाला एकच बस प्राप्त झाली आहे. मागील आठवड्यात बसचे विधिवत पूजन करण्यात आले. नुकतेच आरटीओकडून तात्पुरती पासिंग मिळाली आहे. त्यामुळे रविवार, दि.१६ पासून बस शहराच्या वेगवेगळ्या भागातील नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. या बसला सजविले जाणार असून, ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना माहिती करून दिली जाणार आहे. सात दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. नागरिकांना नवीन बसची माहिती मिळावी, मनपाकडून सिटीबस सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर नागरिकांनाही याचा फायदा घेता येईल. हा उद्देश असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. तीन दिवसांत आणखी २० बसेस येणार आहेत. २३ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सिटीबस सुरू होणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. स्मार्ट सिटीच्या बसवर अजिंठा-वेरूळ लेणी, पाणचक्की, मकबऱ्याचे चित्र दर्शविण्यात आले आहे. शहरातील श्रीमंत शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय, सिद्धार्थ उद्यान, मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय, देवगिरी किल्ला, शहराचे आराध्य दैवत संस्थान गणपती या वास्तूंच्या चित्रांचाही यामध्ये अंतर्भाव करावा, असे पत्र सभापती राजू वैद्य यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना आज दिले आहे.