औरंगाबाद : महापालिकेच्या लेखा विभागातून रस्ते कामाच्या दोन फायली गहाळ झाल्याचा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले; परंतु अद्यापही फायली सापडत नसल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत; पण रेकार्ड असल्याने केवळ नव्याने फायली तयार केल्या जातील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
दोन नगरसेवकांच्या वादात या फायली गहाळ झाल्याची चर्चा होती. ज्योतीनगर-दशमेशनगर वॉर्डामध्ये दोन विकासकामांच्या फायली गेल्या महिन्यात अंतिम मंजुरीसाठी लेखा विभागात आल्या होत्या. या फायलींवर मुख्य लेखाधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्या लिपिकाकडे देण्यात आल्या; परंतु लिपिकाच्या टेबलावरून त्या गहाळ झाल्या. फायलींचा शोध घेतला असता, त्या गहाळ झाल्याचे समोर आले. फायलींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता एका नगरसेविकेच्या दिराने काही फायली नेल्याचे समोर आले; परंतु त्यांनी फक्त माझ्या वॉर्डाच्या फायली नेल्याचे म्हटले. या सगळ्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु गहाळ फायली सापडत नसल्याने या कामांची नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. प्रशासनाकडून फायली गहाळ प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही.