औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे शहीद काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना तब्बल दहा लाख रुपये आर्थिक साह्य देण्याची घोषणा महापालिका सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती. मंगळवार २३ जुलै रोजी काकासाहेब यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे, आजपर्यंत महापालिकेने शिंदे कुटुंबियांना एक रुपयाचेही आर्थिक साह्य दिले नसल्याची बाब समोर आली आहे.
गुरुवार १८ जुलै रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत शहीद काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत का देण्यात आली नाही, असा प्रश्न संतप्त नगरसेवकांनी उपस्थित केला होता. महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलगिरी व्यक्त करीत शुक्रवारी संध्याकाळपर्यंत निधी वितरित केला जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले होते. महापौर फंडातून हा निधी द्यावा, अशी सूचनाही महापौरांनी प्रशासनाला केली होती. शुक्रवारी सायंकाळपर्यंत शिंदे यांच्या फाईलवर आयुक्तांनी सही केली नव्हती. त्यानंतर आयुक्त दिल्लीला गेले होते. सोमवारी त्यांचे मनपात आगमन झाले. सोमवारीही आयुक्तांनी फाईलवर सही केली नाही. मनपा प्रशासनाने महापौर फंडच उभारलेला नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत कोणताही फंड मनपाला उभारता येणार नाही. त्यामुळे आणखी दोन महिने शिंदे कुटुंबियांना मनपाकडून मदत होण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, घोडेले म्हणाले की, महापौर निधी उभारण्यासाठी आम्ही शासनाकडून मंजुरी आणू, असा एक ठराव प्रशासनाला हवा आहे. दोन-तीन दिवसांमध्ये हा विषय मार्गी लागणार आहे.
आंदोलन करण्याचा इशाराकाकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत देण्याचे जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांनी जाहीर केले होते. मात्र, वर्ष लोटले तरीही जाहीर केलेली मदत देण्यात आली नाही. ती त्वरित द्यावी, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांनी दिला आहे.