औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला; पण वातानुकूलित इलेक्ट्रिक बससाठी वेटिंग असल्याने मुंबईच्या बेस्टने खरेदी केलेल्या बसमधून पाच बस औरंगाबाद शहरासाठी मिळाव्यात, अशी विनंती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेतून स्मार्ट सिटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. शहरवासीयांनी या बसला चांगला प्रतिसाद दिला. कोरोनानंतर नव्याने बससेवा सुरू करताना प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. पर्यटन व ऐतिहासिक स्थळांसाठी पाच वातानुकूलित इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने घेतला होता. यासंदर्भात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, बस खरेदीसाठी टाटा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बोलणी झाली. बससाठी वेटिंग असल्यामुळे सहा-सात महिन्यांचा वेळ लागू शकतो. औरंगाबाद दौऱ्यावर आलेले पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कानावर ही बाब घातली. बेस्टने इलेक्ट्रिक बसची ऑर्डर दिली आहे. या बसची संख्या मोठी आहे. त्यामुळे यातील दोन-तीन बस औरंगाबाद शहरासाठी मिळाव्यात अशी विनंती त्यांना केली. त्यावर ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. औरंगाबादला बस मिळतील तेव्हा या बस बेस्टला दिल्या जातील, असे पांडेय यांनी सांगितले.
-----------
दहा वाहने भाड्याने घेणार
महापालिका अधिकाऱ्यांसाठी कार खरेदीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता; पण हा प्रस्ताव स्थगित करून इलेक्ट्रिक कार भाड्याने घेण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. त्यानुसार दहा कार भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. आठ वर्षे वापरल्यानंतर या कार कंपनीला परत देण्याची सुविधा आहे.
------------------