लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या वेंधळ्या कारभाराचा एक नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामांना ब्रेक लावण्याचे आदेश दिलेले असतानाही पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०११ मध्ये उत्पादित केलेले पाईप २०१८ मध्ये वापरण्यात येणार असून, त्या पाईपची विल्हेवाट लावण्यासाठीच हे काम हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पाईप पडले असून, ते नवीन वाटण्याऐवजी एकदम जुनाट झाल्याचे लक्षात येते.कुठल्याही पाईपची जल निर्वाहन क्षमता ही साधारणत: २० वर्षांची असते. मग ८ वर्षे जुने पाईप येथे का वापरण्यात येत आहेत? समांतर जलवाहिनीसाठी काम करणा-या कंपनीने खरेदी केलेले हे पाईप पालिकेतील महाभागांनी दडवून ठेवत आज बाहेर काढून हे काम काढले तर नाही ना, अशी शंका येत आहे.पुंडलिकनगर जलकुंभ पूर्णक्षमतेने भरत नसताना त्या जलकुंभावर ती पाईपलाईन एन-५ टाकण्यात येत असून, त्या कामाचे भूमिपूजनही लगबगीने उरकण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून कुठेतरी दडवून ठेवलेले पाईप या कामासाठी काढण्यात आल्याचे दिसते. १८ लाख रुपयांतून हे काम करण्यात येणार आहे.गेल्या सभेमध्ये प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, रामनगर, अंबिकानगर, चिकलठाणा, मसनतपूर, ठाकरेनगर या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी एन-५ ऐवजी पुंडलिकननगर जलकुंभावरून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे; परंतु सध्या पाईप हनुमान चौक ते एन-४ च्या दिशेने येऊन पडले आहेत. मग ही जलवाहिनी वरील भागांना पाणीपुरवठा करण्याऐवजी कोणत्या भागासाठी टाकली जात आहे, असा प्रश्न आहे....तर रस्त्यावर उतरणारनगरसेवक तथा माजी सभागृह नेते गजानन मनगटे म्हणाले, पुंडलिकनगर जलकुंभ सद्य:स्थितीत पूर्ण क्षमतेने भरत नाही. १ लाख लोकांना पाणी देण्यासाठी तो जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्याची जोपर्यंत व्यवस्था पालिका करीत नाही, तोपर्यंत येथून नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला आमचा विरोध राहील. या विरोधाला दुर्लक्ष करीत जर जलवाहिनी टाकली, तर ती उखडून फेकण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी पुंडलिकनगर, न्यायनगर, गजानननगर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल.
आठ वर्षे जुने पाईप टाकणार मनपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:42 AM