- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग पद्धतीला स्थगिती दिली. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुका जुन्या वॉर्ड पद्धतीनेच होणार आहेत. वॉर्ड पद्धतीत शहरातील ११५ वॉर्डांमधील ३ वॉर्ड गायब होणार आहेत. ते वॉर्ड कोणते हे अद्याप निश्चित नाही. सातारा-देवळाई भागात नव्याने तीन वॉर्ड तयार होतील. या भागात एकूण पाच वॉर्ड ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिकेला नव्याने सर्व ११५ वॉर्ड तयार करावे लागणार असल्याने सर्वांची हद्द आणि रचना बदलणार हे निश्चित.
राज्य निवडणूक आयोगाने १८ डिसेंबर रोजी प्रभाग रचनेच्या सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे आता निवडणूक वॉर्ड रचनेप्रमाणेच होणार हे जवळपास निश्चित आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप यासंदर्भात अंतिम मार्गदर्शन आलेले नाही. दोन ते तीन दिवसांमध्ये यासंदर्भात आयोगाकडून सविस्तर पत्र प्राप्त होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने वॉर्ड रचनेप्रमाणे निवडणूक घ्यायची ठरल्यास त्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यादृष्टीने जवळपास तयारी पूर्ण केली आहे.
महापालिकेला ११५ पेक्षा अधिक वॉर्ड तयार करता येणार नाही. सातारा-देवळाईचा परिसर २०१५ मध्ये मनपात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे या भागात दोन वॉर्ड तयार करून निवडणूक घेण्यात आली होती. २५ हजार मतदारांचा एक वॉर्ड या भागात आहे. वॉर्ड रचनेनुसार महापालिकेच्या निवडणूक विभागात सर्व वॉर्डांची रचना आता दहा हजार मतदारांच्या अनुषंगाने तयार करावी लागेल. सध्या काही वॉर्डांमध्ये ७ हजार, तर काही ठिकाणी १२ हजार मतदार आहेत.
प्रत्येक वॉर्डात एक हजार मतांचा एक ब्लॉक तयार करण्यात येतो. जास्त मतदार असलेल्या वॉर्डातील ब्लॉक काढून शेजारच्या वॉर्डात जिथे कमी मतदार आहेत, तेथे टाकावे लागतील. या प्रक्रियेत वॉर्डांची रचना पूर्णपणे बदलणार आहे. कोणत्या दिशेने ही प्रक्रिया सुरू करावी, कशा पद्धतीने करावी यासंदर्भातील मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोग करणार आहे.
गायब होणारे तीन वॉर्ड कोणते?नवीन वॉर्ड रचनेनुसार तीन वॉर्ड कमी होणार आहेत. आता हे तीन वॉर्ड कोणते असतील यावर आता महापालिकेत खल सुरू झाला आहे. विद्यमान ११५ पैकी तीन वॉर्डांचे नावच गायब होणार आहे. त्यामुळे त्या वॉर्डातील विद्यमान नगरसेवकांना आसपासच्या वॉर्डांमध्ये घुसखोरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
तीन नवीन वॉर्ड जन्माला येतीलसातारा-देवळाईत सध्या दोनच वॉर्ड आहेत. या भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन मनपा प्रशासन तेथे पाच वॉर्ड तयार करणार आहे. त्यामुळे या भागातील इच्छुकांना नवीन वॉर्डांमध्ये निवडणूक लढवावी लागणार आहे. इच्छुकांनी आतापासूनच तयारीही सुरूकेली आहे. मात्र वॉर्ड कसा राहील हे त्यांनाही माहीत नाही.