औरंगाबाद : महापालिकेतील सहा प्रभाग कार्यालयातील वसुली कर्मचाऱ्यांनी आज प्रभाग ‘ब’ कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केले. कर वसुलीमध्ये समाधानकारक काम न केल्यामुळे प्रशासनाने वेतन रोखल्याच्या निषेधार्थ व ओव्हरटाईम, पेट्रोल भत्त्यात वाढ करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. ३०० रुपये पेट्रोल भत्ता कर्मचाऱ्यांना दिला जातो. महिनाभर तो भत्ता पुरत नाही. एलबीटी विभागातील कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये पेट्रोल भत्ता आणि ओव्हरटाईम वेळेत देण्यात येतो. एलबीटीचे कर्मचारी व्यापाऱ्यांकडे जातात. वसुली विभागातील कर्मचाऱ्यांना ९० टक्के मालमत्ताधारकांकडे जावे लागते.वसुली कर्मचाऱ्यांना सापत्न वागणूक का दिली जाते, असा सवाल करीत सुमारे ६० कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. दरम्यान, सायंकाळी वसुली कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यात आले असून, करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन, प्रभाग अधिकारी रोशन मकवाने, व्ही. डी. राठोड, विठ्ठल ढाके, प्रियंका केसरकर, एस. आर. जरारे, सी. एम. अभंग यांचे वेतन थांबविण्यात आले आहे. अधिकारी झनझन यांनी सांगितले, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे आदेश होते. परंतु तो निर्णय मागे घेण्यात आला आहे. वसुली अपेक्षित न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.
पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By admin | Published: January 02, 2015 12:31 AM