औरंगाबाद : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीला बोनस मिळण्याचे वांधे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्त प्रकाश महाजन हे हरियाणा येथे निवडणूक निरीक्षक म्हणून गेले आहेत, तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. प्रशासनही निवडणुकीत ड्यूटीवर आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विचार २१ आॅक्टोबरपर्यंत होईल, अशी चिन्हे सध्या दिसत नाहीत. महापौर कला ओझा या स्वत: निवडणूक मैदानात आहेत. उर्वरित पदाधिकाऱ्यांचे नेते उमेदवार आहेत. विरोधी पक्षाचे पदाधिकारी आपापल्या मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. मनपाच्या खर्चाचा ताळमेळ १ सप्टेंबरपासून बिघडला आहे. अंदाजे १२ कोटी रुपये एलबीटीतून जमा झाले आहेत. दरमहा १८ कोटी रुपये एलबीटीतून जमा होतात. पितृपक्षामुळे एलबीटीला फटका बसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी मध्यंतरी केला. ३१ आॅगस्टपर्यंत ३२ कोटी रुपये ठेकेदारांचे, तर सप्टेंबरमधील वेतन आणि कर्जहप्ते व समांतरची देणी मिळून ५६ कोटी रुपये मनपाला लागणार आहेत. त्यातच बोनस व अग्रीम मिळून अंदाजे अडीच कोटी रुपये जास्तीचे लागणार आहेत. २० महिन्यांत पालिकेची घडी कशीबशी बसली होती. मात्र, पथदिवे, समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, व्हाईट टॉपिंगचे रस्ते, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यांच्या कामांवर जास्तीचा खर्च झाला. खाजगीकरणातून विकासकामे सुरू झाल्यामुळे मनपाला उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावे लागणार आहेत. गेल्या दिवाळीला चतुर्थ श्रेणीत कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांचा सुट्यांचा मोबदला व २ हजार ४१९ रुपये सानुग्रह अनुदानापोटी असे मनपाने अडीच कोटी रुपये दिले होते. वर्ग-४ च्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हाती २७ हजार रुपये पडले होते. ४ हजार ८८३ कर्मचाऱ्यांना ती रक्कम अदा करण्यात आली होती. ४वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांना ५ हजार अॅडव्हान्स, दैनिक वेतनावरील व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १ हजार दिवाळी भेट दिली होती. महिला बचतगट आणि लिंक वर्कर्सला २ हजार दिवाळी भेट, तर दै. वेतनावरील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांना ३ हजार अॅडव्हान्स दिले होते.
मनपा कर्मचाऱ्यांच्या बोनसचे वांधे
By admin | Published: September 30, 2014 1:21 AM