औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे नवीन विकास कामांना कात्री लावली आहे. त्यामुळे सर्व वाॅर्ड कार्यालयांमधील अभियंत्यांना ड्रेनेज दुरुस्तीशिवाय दुसरे कामच शिल्लक नाही. मार्चपर्यंत वसुली चांगली झाली तर अर्थसंकल्पात समाविष्ट काही विकास कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या प्रशासकांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मंजूर केला. त्यात शहराला डोळ्यासमोर ठेवून विकास कामे समाविष्ट केली. रस्ते, ड्रेनेज आदी कामांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. मागील आठ महिन्यांपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी राबते आहे. त्यामुळे तिजोरीत सध्या प्रचंड खडखडाट आहे.
अर्थसंकल्पात समाविष्ट विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करून अभियंत्यांनी वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. मार्चअखेरपर्यंत वसुलीमुळे थोडाफार निधी प्राप्त झाला तरच विकास कामे होऊ शकतात. त्यामुळे सध्या महापालिकेतील वाॅर्ड अभियंते कामाविना बसून आहेत. ड्रेनेज दुरुस्तीची कामे कंत्राटदार करायला तयार नाहीत. महापालिकेने मागील काही दिवसांपूर्वी कंत्राटदारांना बिले दिली. त्यामध्ये ड्रेनेजच्या कंत्राटदारांना एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे अभियंत्यांची प्रचंड गोची होत आहे.