औरंगाबाद : महापालिकेला मालमत्ताकर, पाणीपट्टी करापोटी नागरिकांकडून चक्क खोटे धनादेश देण्यात येत होते. धनादेश वठू नये यादृष्टीने जाणीवपूर्वक चुका करण्यात येत होत्या. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता धनादेश वटला नाही तर जबर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा दंड नागरिकांसह मनपा कर्मचाऱ्यांनाही लावण्यात येणार आहे.
महापालिकेची शहरात मालमत्ताकराची ४२७ कोटी, पाणीपट्टी करापोटी ३४७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रशासनाने थकबाकी वसुलीसाठी कारवाया सुरू केल्या आहेत. बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या जात असून, ही कारवाई टाळण्यासाठी अनेक जण महापालिकेच्या पथकाची धनादेश देऊन बोळवण करीत आहेत. अनेकांचे धनादेश बँकेत अपुरी रक्कम, चुकीची सही, अक्षरी रक्कम वेगळी व अंकातील रक्कम वेगळी, तारखेत चुका असणे, नॉन सीएसटीची धनादेश देणे, शाई बदल असणे, धनादेशावर सही नसणे यासह इतर कारणांमुळे अनादरीत होत आहेत. त्यामुळे वसुली होऊनही महापालिकेच्या तिजोरीत रक्कम जमा होत नाही. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला. धनादेश वटला नाही तर संबंधितांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्याची चुकी असेल तर त्यालासुद्धा दंड आकारण्याचा ठराव मुख्य कर निर्धारक व संकलक उपायुक्त अपर्णा थेटे यांनी ठेवला होता. हा ठराव पांडेय यांनी मंजूर केला.
------------
दोन महिन्यांत १ कोटीचे धनादेश वठलेच नाहीत
गतवर्षी सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचे धनादेश वठले नव्हते. तर गेल्या सव्वादोन महिन्यांत २२८ धनादेश वठलेले नाहीत. त्याची रक्कम १ कोटी ६ लाख ३५ हजार एवढी आहे. यातील ८९ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तर काही जणांनी रक्कम भरल्याचे अपर्णा थेटे यांनी सांगितले.
-----------
महापालिका अशा पद्धतीने दंड आकारणार
धनादेशाची रक्कम -दंड
१ ते १००० रुपये -१००
१००० ते ५००० हजार -२००
५००० ते १०००० हजार - ३००
१०००० ते १००००० लाख -१,०००
एक लाख व पुढील रक्कम - २,०००
----------