छत्रपती संभाजीनगर : खंडपीठाने कॅनॉट मार्केटच्या अतिक्रमणांसंदर्भात महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीने पाऊल उचलत कायमस्वरूपी १० कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमण्याचा निर्णय घेतला. हे पथक दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत या भागातील अतिक्रमणांवर नजर ठेवून कारवाई करणार आहे.
खंडपीठाच्या आदेशानुसार सिडको एन-१ ते एन-१३ पर्यंतची अतिक्रमणे मागील वर्षी मार्च महिन्यात काढण्यात आली. या कारवाईवर न्यायालयाने अलीकडेच तीव्र शब्दांत सुनावणीत नाराजी दर्शविली. मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कॅनॉट प्लेस भागात काही व्यापारी समोरील भागात टेबल लावून ग्राहकांना विविध खाद्यपदार्थ देतात. महापालिका अशा व्यापाऱ्यांवर निव्वळ कारवाईचा देखावा करते, असे यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या वकिलांनी न्यायालयात नमूद केले. पोलिस, महापालिका कॅनॉट भागाला ‘टार्गेट’ करीत असल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. वारंवार कारवाई होत असल्यामुळे ग्राहक निघून जातात. या भागातील व्यवसाय बंद पडण्याची वेळ आली असल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान पत्रकारांशी बोलताना अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी नमूद केले की, कॅनॉट प्लेस भागात कारवाईसाठी १० जणांचे पथक तयार केले आहे. हे पथक सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत कारवाई करणार आहे. याशिवाय पथक आसपासच्या भागातही वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करेल.
अधिकारी वैद्यकीय रजेवर?अतिक्रमण हटावच्या कारवाईचे संपूर्ण प्रेशर सध्या वॉर्ड अधिकाऱ्यांवर आले आहे. आतापर्यंत तीन वॉर्ड अधिकाऱ्यांनी स्वत:हून बदली करवून घेतली. उर्वरित वॉर्ड अधिकारीही ‘हा काटेरी मुकुट नको’ अशी विनंती खासगीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना करीत आहेत. एका अधिकाऱ्याने तर वैद्यकीय रजेवर जाण्याची विनंती केली. वरिष्ठांनी त्यांची समजूत घालून थांबायला सांगितले.
कारवाई करा, पण कर्मचारी नाहीतवॉर्ड अधिकाऱ्यांना अतिक्रमणांवर कारवाईचे अधिकार प्रशासनाने दिले. त्यासाठी लागणारे मनुष्यबळच वॉर्ड कार्यालयांकडे नाही. अतिक्रमणे काढण्यासाठी कुशल कर्मचारी हवे असतात. ते फक्त मनपा मुख्यालयातील अतिक्रमण हटाव विभागाकडे आहेत. त्यामुळे वॉर्ड अधिकारी अडचणीत सापडले आहेत.