औरंगाबाद : महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या वॉर्ड रचना आणि आरक्षणावर प्रचंड ओरड होत आहे. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात अजिबात नाराजी नाही. सर्वसामान्य कार्यकर्ते, नगरसेवक यावर मोठ्या प्रमाणात नाराजी दर्शवीत आहेत. हा सर्व विषय उद्या अहवालाच्या स्वरूपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. यामध्ये दोष आढळून आल्यास निश्चितपणे मुख्यमंत्री कारवाईसंदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती आज सेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेने प्रारूप आराखडा तयार करताना वॉर्डाची चतु:सीमा, मागील आरक्षण, वॉर्डाची लोकसंख्या आदी निकष अजिबात पाळलेले नाहीत. काल दिवसभरात मी ३४ वॉर्डांचा आढावा घेतला. आज २५ पेक्षा अधिक वॉर्डांची माहिती घेतली. सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते नाराजी दर्शवीत आहेत. ही सर्व प्रक्रिया चुकीची असू शकते. सध्याची वॉर्ड रचना आमच्यासाठी अत्यंत पोषक असल्याचेही घोसाळकर यांनी नमूद केले. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ओरड मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यात येईल. प्रारूप आराखडा मी अद्याप बघितला नाही, तो बघण्यासाठी मागविला आहे. कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही वॉर्डांचे आरक्षण जाणीवपूर्वक टाकण्यात आले. महिला आरक्षण थेट टाकले. हे सर्व प्रकार अत्यंत गंभीर आहेत. मी सर्व हकीकत ऐकून घेतली आहे. माझा अहवाल पालकमंत्री सुभाष देसाईमार्फत मुख्यमंत्र्यांसमोर सादर करणार आहे. पत्रकार परिषदेत आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले,नगरसेवक राजू वैद्य, शहरप्रमुख विजय वाघचौरे उपस्थित होते.
सातारा-देवळाईत सर्वाधिक ओरडसातारा-देवळाईत नव्याने पाच वॉर्ड तयार करण्यात आले. तेथे पाच वॉर्डांवर अनुसूचित जातीचे आरक्षण टाकल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये सर्वाधिक नाराजी दिसून आली. या भागात तीन नवीन वॉर्ड तयार करण्यासाठी संपूर्ण शहर विस्कळीत करण्यात आल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.