छत्रपती संभाजीनगर : रस्त्यांवरील तांत्रिक दोषामुळे गुरुवारी सकाळी सिडको उड्डाणपुलाजवळ गॅस गळती झाली. भविष्यात अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय शुक्रवारी मनपा प्रशासनाने घेतला. यासाठी अधिकारी, तज्ज्ञांची समिती नेमली जाईल. ७ दिवसांत समितीने अहवाल देणे अपेक्षित आहे. त्यानंतर युद्धपातळीवर विविध उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शुक्रवारी माध्यमांशी बोलताना जी. श्रीकांत यांनी नमूद केले की, ही घटना टाळता आली असती. रस्त्यातील तांत्रिक दोष हे मुख्य कारण आहे. उड्डाणपूल रस्त्याच्या बाजूला बांधला. आता उड्डाणपूल पाडणे तर शक्य नाही. किमान उपाययोजना करणे तरी सहज शक्य होते. सा. बां. विभागाने रिफ्लेक्टर, डायव्हर्शन ॲरो बोर्ड वगैरे काहीच केले नाही. त्यामुळे जालना रोडसह प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक समिती नेमली जाईल. समितीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, वाहतूक पोलिस विभागातील अधिकारी, सा. बां. आणि महावितरण कंपनीचे अधिकारी असतील. समिती सात दिवसांत अहवाल सादर करेल. सर्व प्रकारच्या जड वाहनांना जालना रोडवर बंदी केली जाणार आहे. बीड बायपास रस्त्यावरूनच जड वाहने यापुढे जातील. याबद्दलचे आदेश लगेचच काढण्यात येत आहेत.पर्यायी रस्ते त्वरित शोधा
जालना रोड बंद झाल्यानंतर कामगार चौक व अन्य भागात वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. शुल्लक कारणांसाठी अर्धवट राहिलेले रस्ते शोधावेत, असे आदेश अधिकाऱ्यांंना दिले. झेंडा चौक येथे काही अतिक्रमणे, मालमत्तांचे भूसंपादन बाकी आहे. मोबदला देणे नंतर बघू, तूर्त शहराला वेठीस धरता येणार नाही. अगोदर रस्ता हे आमचे उद्दिष्ट आहे. जिन्सी ते दूध डेअरी, पीईएस कॉलेजमधील डीपी रोड करणे हे शहरासाठी आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आवश्यक आहे. कैलासनगर ते एमजीएम हा रस्ताही युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासन म्हणाले.
बायपासवर अशी घटना घडली तर?बीड बायपासवर अशी घटना घडली तर काय करणार? असा प्रश्न जी. श्रीकांत यांनी केला. सोलापूर-धुळेकडे वाहतूक कशी वळविणार, याचाही विचार आताच झाला पाहिजे. भविष्याचा विचार करून आताच ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
अग्निशमनला साधनांची गरजशहरात किमान १० ठिकाणी अग्निशमन केंद्र हवे. मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आता मनुष्यबळाची चिंता नाही. त्यांना गॅस गळती, पूर परिस्थिती, भूकंप आदी आपत्तीच्या वेळी कसे काम करावे, याचे प्रशिक्षण दिले जाईल. डिझास्टर मॅनेजमेंट हा विभाग सक्षमपणे सांभाळतोय. त्यांना विविध साधनांची गरज आहे. ती साधने कोणती, यावर आम्ही काम करतोय.
जागोजागी टँकर भरता यावेतगुरुवारी घटनास्थळापासून एन-६ पाण्याची टाकी जवळ होती. तसेच नक्षत्रवाडी एसटीपीचे पाणी वापरण्यात आले. आणीबाणीचा विचार करून शहरात टँकर भरण्यासाठी ठिकठिकाणी सोय असायला हवी. टँकर भरून आणण्यात कमीत कमी वेळ गेला पाहिजे, असेही प्रशासक म्हणाले.