औरंगाबाद : एप्रिल-२०२० मध्ये होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वॉर्ड रचनांना आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर गुरुवारी (दि.२७) झालेल्या प्राथमिक सुनावणीअंती औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस.डी. कुलकर्णी यांनी प्रतिवाद्यांना नोटिसा बजाविण्याचा आदेश दिला.
माजी नगरसेवक समीर राजूरकर आणि किशोर तुळसीबागवाले, तसेच राष्टÑवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल विधाते यांच्या याचिकांवर प्राथमिक सुनावणी झाली. राजूरकर आणि विधाते यांच्या वतीने अॅड. देवदत्त पालोदकर, तर तुळशीबागवाले यांच्या वतीने अॅड. चंद्रकांत थोरात यांनी काम पाहिले. या तीन याचिकांवरील पुढील सुनावणी ५ मार्च रोजी होणार आहे. तर पानदरिबा वॉर्डातील नागरिक लक्ष्मीनारायण बाखरिया यांनी गुरुवारी (दि.२७) दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि.२ मार्च) प्राथमिक सुनावणी होणार आहे. त्यांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे काम पाहत आहेत.
तुळशीबागवाले यांनी त्यांच्या याचिकेत पूर्वीच्या राजाबाजार वॉर्ड क्रमांक ४७ चे विभाजन करून नवीन वॉर्ड क्रमांक ३६ आणि ५० निर्माण केल्याचा उल्लेख केला आहे, असे करताना मूळ वॉर्डाची भौगोलिक सीमा, मुख्य रस्ते आणि एकाच कुटुंबातील सदस्यांचे (मतदारांचे) विभाजन करून निवडणूक आयोगाच्या निर्देशांचा भंग केला आहे. शिवाय नवीन वॉर्ड रचना करताना मूळ मतदार संख्येत जास्तीत जास्त १० टक्क्यांपेक्षा जादा तफावत ठेवता येत नाही, असे आयोगाचे निर्देश असताना या नवीन वॉर्डातील मतदारांच्या संख्येत १५ टक्क्यांपेक्षा जादा तफावत असल्याचे मुद्दे अॅड. थोरात यांनी मांडले.