लोकमत न्यूज नेटवर्कबीड : उद्यापासून दिवाळीच्या सणाला प्रारंभ होणार आहे. अजूनही आम्हाला पगार मिळालेला नाही. किमान सोमवारी तरी पगाराचे वाटप करुन आमची दिवाळी गोड करावी, अशी मागणी येथील नगर परिषद कर्मचारी संघटनेने केली आहे.बीड जिल्ह्यातील नगर परिषदांचे सहाय्यक अनुदान बँक खात्यावर जमा करण्याबाबत जिल्हा प्रशासन अधिका-यांनी कार्यवाही केली होती. त्यानुसार ३ कोटी ५६ लाख ५८ हजार ९३३ रुपये बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, धारुर, केज नगरपंचायतींच्या बँक खात्यावर जमा झाले. मात्र, बीड नगर पालिकेकडून कर्मचा-यांना आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. या संदर्भात ४ आॅक्टोबर रोजी नगर परिषद कर्मचारी संघटनेने मुख्याधिका-यांना निवेदन दिले होते. यामध्ये दिवाळीचा सण जवळ येत असल्यामुळे कर्मचा-यांना सणाच्या खरेदीसाठी पैशांची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते. तसेच शासनाने वाढ लागू केलेल्या दोन डी. ए. वाढीच्या फरकाची रक्कम थकित असून, ती त्वरित द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, १० दिवसानंतरही या निवेदनावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न नगर परिषदेच्या कर्मचा-यांपुढे उभा आहे.अखेर रविवारी कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा निवेदन देत आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन तसेच थकीत डी. ए. ची रक्कम देण्याची मागणी केली आहे.या निवेदनावर अध्यक्ष अनिल माटे, उपाध्यक्ष ताजोद्दीन पठाण, सचिव गोरख साळवे, कार्याध्यक्ष नरेंद्र वडमारे, सदस्य केरबा शिंदे, विष्णू गायकवाड, आर. सी. वैष्णव आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
उद्यापासून दिवाळी, आज तरी पगार द्या...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:36 AM