औरंगाबाद : आचार्य देवनंदीजी महाराज यांचे परमआत्मीय शिष्य व अग्रवाल जैन समाजाचे औरंगाबाद रहिवासी मुनीश्री संपन्नकीर्ती महाराज (७५) यांचे राजस्थान येथील अतिशय क्षेत्र महावीरजी येथे बुधवारी सकाळी ११.२० वाजता समाधीमरण झाले.आचार्य चैत्यसागर महाराज, उपाध्याय आत्मसागर महाराज,मुनी चिन्मयानंद महाराज, मुनी युधिष्ठिरसागर महाराज यांच्या उपस्थितीत दुपारी ३ वाजता मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.मुनीश्रीजींच्या प्रेरणेने औरंगाबादेत हडको जैन मंदिर येथे संपन्नकीर्ती पाठशाळा सुरूआहे. संपन्नकीर्ती महाराज यांनी गृहस्थाश्रमात श्रीक्षेत्र, वेरूळ, जटवाडा, कचनेर येथील विश्वस्त म्हणून कार्य केले. फुलंब्री तालुक्यातील किनगाव या खेडेगावात ७ मार्च १९४३ रोजी त्यांचा जन्म झाला. गृहस्थाश्रमातील सुधाकर हिरासा साहुजी या नावाने ते ओळखले जात होते. १९६७ मध्ये त्यांनी बी.ई.मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी संपादन केली. त्यांचा औषधी एजन्सीचा मोठा व्यवसाय होता. श्रवणबेळगोळ येथे ४ एप्रिल २००७ रोजी सुधाकर साहुजी व शोभा साहुजी या दाम्पत्यांनी आचार्य देवनंदिजी महाराजांच्या हस्ते दीक्षा घेतली होती.त्यांचे श्रवणबेळगोळ, चेन्नई, पाँडिचेरी, नाशिक गजपंथ, बारामती, कुंथुगिरी, औरंगाबाद, देऊळगावराजा, श्रीसम्मेदशिखरजी, लखनौ, मेरठ असे ११ ठिकाणी चार्तुमास झाले. अत्यंत कठीण असलेल्या श्री सम्मेद शिखरजीच्या १११ वंदना-तीर्थयात्रा करून त्यांनी इतिहास निर्माण केला. त्यांना अश्विनकुमार साहुजी व नीरज साहुजी ही दोन मुले व करुणा साहुजी व प्रियंका अग्रवाल या दोन मुली आहेत.
मुनीश्री संपन्नकीर्ती महाराज यांचे समाधीमरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 04:16 IST