औरंगाबाद : हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी अजमेर (राजस्थान) येथे लपून बसलेला कुख्यात गुन्हेगार मुन्ना बोचरा ऊर्फ शेख बशीर शेख करीम (४०, रा. कासमदरी, पडेगाव) यास अटक केली. या खूनप्रकरणी आतापर्यंत झालेली ही अकरावी अटक आहे. यातील पाच जणांना न्यायालयाने जामीन दिला आहे.
२७ डिसेंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास अंगुरीबाग येथून लक्ष्मी कॉलनीतील घरी निघालेल्या शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून २८ डिसेंबर रोजीच गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. तपासादरम्यान शेरखान यांच्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांचा खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अन्य चार आरोपींना अटक केली. तपासादरम्यान आरोपी खालीद अन्सारी ऊर्फ शहारुख बाबा अजीज अन्सारी आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात घरफोड्या मुन्ना बोचरा ऊर्फ शेख बशीर हा दुचाकीवर अन्य आरोपींसोबत तेथे गेला होता.
त्याचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी चार मारेकऱ्यांना अटक केल्यापासून मुन्ना बोचरा पसार झाला होता. औरंगाबादेतून तो बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथे गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो तेथून थेट राजस्थानमधील अजमेरला गेला. त्याने पळून गेल्यानंतर मोबाईल नंबर बदलला होता. त्याचा नवीन नंबर पोलिसांनी मिळविला. चार दिवसांपूर्वी तो अजमेर येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर सायबर क्राईम सेल आणि अजमेर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी गुन्हे शाखेने अजमेर येथे मुन्नाच्या मुसक्या आवळल्या. मुन्नाच्या अटकेमुळे शेरखान खून प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या अकरा झाली. सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय पवार, हेमंत तोडकर, पोहेकॉ. शिवाजी झिने, विलास वाघ, धुडकू खरे, सुनील धात्रक, प्रभाकर राऊत, रवी दाभाडे, विशाल सोनवणे आणि चालक म्हस्के यांनी ही कारवाई केली.
२६ डिसेंबर रोजीच होणार होती हत्याशेरखान यांची कट रचून आणि सुपारी देऊन हत्या करण्यात आली. २७ डिसेंबर रोजी रात्री आरोपींनी त्यांची हत्या केली. मात्र एक दिवस आधीच आरोपी त्यांच्या मागावर होते; परंतु त्यांच्या नजरेतून शेरखान निसटल्याने आरोपींनी दुसºया दिवशी अधिक मजबूत प्लॅन करून शेरखान यांना संपविले, असे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले.