छत्रपती संभाजीनगर : जिल्हा आरोग्य विभागात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदासाठी बनावट पदवी प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभयकुमार धानोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर बनावट डॉक्टरच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा सिटीचौक पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
मोहसीन खान शेरखान पठाण (रा. सिल्लोड) असे बनावट पदवी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. डॉ. अभयकुमार धानोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोग्य विभागात कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीमध्ये बीएएमएसची पदवी देऊन मोहसीन खान याने नोकरी मिळवली होती. मात्र, त्याच्या पदवी प्रमाणपत्राची अधिक माहिती घेतल्यानंतर ते बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे शासनाची दिशाभूल करीत नोकरी मिळविल्याचे स्पष्ट झाले. शासनाच्या आदेशानुसार मोहसीन खान याच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ एप्रिल २०२२ ते ६ मार्च २०२३ या कालावधीत घडला असल्याचे उघडकीस आले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक उद्धव हाके करीत आहेत.