बीड : दरवर्षी मुप्टा संघटनेच्या वतीने दिला जाणाऱ्या क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे वितरण रविवारी पार पडले. मुप्टा संघटनेतील मान्यवरांच्या उपस्थितीत २० शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रदीप रोडे हे होते. गेल्या आठ वर्षांपासून मुप्टा संघटनेच्या महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले जाते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर, मुप्टाचे विभागीय सचिव सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष शरद मगर, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. संभाजी वाघमारे, प्रा. प्रदीप सूर्यवंशी, प्रा. भारत मगर, प्रा. सुनील जाधव, प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, सुभाष पौळ, एस.टी. गायकवाड, प्रा. राम गायकवाड, प्रा. प्रवीण तरकसे, माध्यमिक जिल्हा सचिव श्रीकांत वारभुवन, प्रा. राम गव्हाणे आदींची उपस्थिती होती.‘मी सावित्री’ यामधून ऐश्वर्या लोळगे, सिंधू जाधव, अश्विनी सपकाळ, राजश्री कुंभार, मधू चक्रे, दामिनी तांगडे, आम्रपाली पारखे आदी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट मांडला. प्रा. राम गायकवाड यांनी प्रास्ताविकात मुप्टा संघटनेच्या वाटचालीविषयी माहिती दिली. शिक्षकांच्या माध्यमातून एक नवी पिढी घडत असून, बदलत्या काळाच्या ओघात शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर म्हणाले. याशिवाय आपल्या कर्तव्याविषयी जाणीवही त्यांनी करून दिली. अध्यक्षीय मनोगतात प्रा. रोडे यांनी मुप्टा संघटनेची व्याप्ती सांगून दरवर्षी विविध प्रसंगानुसार संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमांचा लेखाजोखा मांडला. गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात १२५ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हाभरातील शिक्षकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
‘मुप्टा’चा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
By admin | Published: January 29, 2017 11:54 PM