वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील विटावा येथील भारत निवृत्ती आल्हाट (२७) याचा ८ महिन्यांपूर्वी घाणेगाव-नांदेडा रस्त्यावर मृतदेह आढळून आला होता. भारतचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाणेगाव-नांदेडा रस्त्यावर ३० आॅक्टोबर अनोळखी तरुण बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तरुणाची झडती घेतली असता त्याच्या खिशत भारत आल्हाट (रा.विटावा) या नावाचे आधारकार्ड मिळून आले होते. यावरुन पोलिसांनी त्याची पत्नी कोमल हिला घटनास्थळ बोलावून घेतले. तिने बेशुद्ध तरुण आपला पती भारत असल्याचे पोलिसांना सांगितले.
दरम्यान, भारत याला पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले होते. भारत याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी भारतचा मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन केला होता. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली होती.
भारतच्या अंगावरील कपडे, व्हिसेरा सोबत घेऊन उपनिरीक्षक कोपनार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. यावेळी पोलिसांना घटनास्थळी पाच वेग-वेगळ्या आकाराचे दगड, रक्तमिश्रित माती, एक चप्पल जोड जमा करुन न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवून दिले होते. प्रयोग शाळेतील अहवाल व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायवरुन भारतचा मृतयू मारहाणीमुळे झाल्याचे तपासात उघड झाले.
पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सोमवारी तर सहा.पोलिस आयुक्त सावंत यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अज्ञात मारेकºयाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.निरीक्षक घेरडे हे करीत आहेत.