औरंगाबाद : शेतीच्या वादातून खून केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश पी.पी. कर्णिक यांनी पैठण तालुक्यातील इमामपूरवाडी शिवारातील हरी आणि विजू बंडू सावंत या दोघा सख्ख्या भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला.
या खटल्याची हकिकत अशी की, बळवंतराव देशमुख यांनी बंडू सावंत यांच्याकडून दोन एकर शेती विकत घेतली होती. ती त्यांनी त्यांचा मुलगा माधवच्या नावे केली होती. यासंदर्भात त्यांचा दुसरा मुलगा प्रताप यांनी पैठणच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल प्रतापच्या बाजूने लागला होता. २६ डिसेंबर ११ रोजी फिर्यादी प्रतापच्या आईचा दहाव्याचा कार्यक्रम होता. त्यादिवशी आरोपी रोहिदास आणि विजू यांनी वादग्रस्त शेतात येऊन ट्रॅक्टरने ‘रोटा’ मारला; परंतु फिर्यादीची आई वारल्यामुळे त्यांनी कुठलाही वाद घातला नाही. तेराव्याच्या दिवशी पुन्हा आरोपींनी शेतात घुसून ऊस तोडण्यास सुरुवात केली. त्याला माधव यांची पत्नी सुनीता हिने विरोध केला असता आरोपींनी तिला दमदाटी केली.
त्यानंतर ६ जानेवारी २०११ रोजी दुपारी पुन्हा आरोपींनी ‘त्या’ शेतात येऊन रोटा मारण्यास सुरुवात केली. त्यांना प्रताप आणि त्यांचा भाऊ माधव यांनी विरोध केला असता आरोपींनी माधवला लोखंडी पाईपने डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. सुनीता व इतरांनी त्यांचे भांडण सोडविले. माधवर प्रथम घाटी दवाखान्यात आणि नंतर खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना माधवचे ८ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
याप्रकरणी बंडू सावंत (यांचे सुनावणीच्या काळात निधन झाले), त्यांची मुले रोहिदास (सध्या फरार) शिक्षा झालेले हरी आणि विजू तसेच न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेले अंबादास ढाकणे आणि ज्ञानेश्वर काकडे यांच्याविरुद्ध पैठण न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील कैलास पवार (खंडाळकर) यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.