औरंगाबाद : दोन महिन्यांपूर्वी राजाबाजार येथे बालकाचे शिर कापून फेकल्या प्रकरणाचा उलगडा करण्यात सिटीचौक पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बालकाची निर्दयी माता, तिचा प्रियकर आणि आई-वडिलांनी हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
गीता अजय नंद (३४), तिचा प्रियकर हरीशकुमार सुभाषलाल पालीवाल (३८), रतनलाल भोलाराम चौधरी (७४) आणि गंगाबाई रतनलाल चौधरी (७०, सर्व रा. धावणी मोहल्ला), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, आरोपी गीता आणि हरीश यांचे अनैतिक संबंध होते. यातून तिला गर्भधारणा झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर ती गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात गेली. मात्र, कायद्यानुसार गर्भपात करता येणार नाही, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. दरम्यान, २८ एप्रिल रोजी रात्री गीताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. समाजात नाचक्की होईल म्हणून गीता, तिचा प्रियकर हरीश आणि आई-वडिलांनी रात्रीच्या अंधारात त्या बाळाची निर्घृण हत्या केली. यानंतर त्यांनी घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये ते अर्भक पुरून टाकून पुरावा नष्ट केला.
२९ रोजी सकाळी बाळाचे शिर तोंडात घेऊन जाणाऱ्या कुत्र्याला महापालिकेच्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी पाहिले होते. त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे पोलिसांना माहिती मिळत नव्हती. दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याला हे कृत्य करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना याविषयी माहिती दिली. यानंतर डी.बी. पथकाचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, सहायक फौजदार हरीश खटावकर, अप्पासाहेब देशमुख, संजय नंद, संदीप तायडे, त्र्यंबक दापके, अभिजित गायकवाड, महिला कर्मचारी आशा बडे आणि किरण डिकोंडवार यांनी रात्री संशयित आरोपी हरीश पालीवाल आणि रतनलाल चौधरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी हे कृत्य केल्याचा इन्कार केला. नंतर पोलिसांसमोर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मंगळवारी सकाळी गीता आणि तिची वृद्ध आई गंगाबाई यांना अटक करण्यात आली.